मनमाड : मुंबई, ठाणे आणि नाशिकला दररोज ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या मनमाड - मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेसच्या २० बोगीपैकी १० बोगी सर्वसाधारण करण्यात आल्या आहेत. दोन बोगी मासिक पासधारकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. यातील ५ बोगी नाशिकरोडला उघडणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह चाकरमान्यांची मागणी पूर्ण झाली आहे.
मासिक पासधारकांकरिता पंचवटी एक्स्प्रेसच्या डी ७ आणि डी ८ या बोगी असून पासधारकांसाठी राखीव आहेत. याशिवाय डी - ९ ते डी - १८ या बोगी जनरल आहेत. पंचवटीप्रमाणे उपयुक्त तपोवन, नंदीग्राम, राज्यराणी या गाड्यांसाठी शनिवार, १२ मार्चपासून रिझर्वेशनऐवजी जनरल तिकीट देणे रेल्वेने सुरू केले. मात्र, या गाड्या मुंबईला जाताना जनरल झाल्या आहेत. मुंबईहून परतताना रिझर्वेशनचे तिकीट काढावे लागत आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. इगतपुरी - भुसावळ मेमू लोकल सुरू झाली आहे. नाशिक - कल्याण लोकल सुरू करण्याची चाचणी लवकरच होणार आहे. २९ जून २०२२ पासून लांबपल्ल्याच्या १६५ गाड्या पूर्वीप्रमाणे जनरल होणार आहेत. त्यासाठी लसीकरण सक्तीचे राहील. वैद्यकीय कारणांमुळे ज्या प्रवाशांनी लस घेतली नाही, त्यांना डॉक्टरांचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. १८ वर्षांखालील युवा वर्गाला ओळखपत्र प्रवासादरम्यान जवळ ठेवावे लागणार आहे. ज्या गाड्यांचे डबे जनरल करण्यात आले आहेत, त्यातूनच तिकीटधारकांना जनरल प्रवास करता येईल.
कोट....
रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचा चाकारमान्यांना तसेच सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. पंचवटी एक्स्प्रेसप्रमाणेच चाकरमान्यांची जीवनदायिनी गोदावरी एक्स्प्रेसदेखील रेल्वे प्रशासनाने सुरू करावी.
- नरेंद्र खैरे, सदस्य, प्रवासी संघटना
कोट...
मुंबईला जाण्यासाठी आजही पंचवटी एक्स्प्रेसशिवाय सर्वाधिक सोयीची अन्य रेल्वे उपलब्ध नाही. त्यामुळे ही रेल्वे उपलब्ध न झाल्यास प्रवाशांचे हाल होतात. सध्या तर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा विस्कळीत असून त्यामुळे रेल्वे हा एकमेव आधार आहे.
- श्याम दराडे, प्रवासी