- संजय दुनबळे (नाशिक)
नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मका, सोयाबीन वगळता इतर भुसार मालाची आवक खूपच मंदावली. यंदा उत्पादन कमी झाल्यामुळे बाजरीचे भाव वाढले असून, २,२०० ते २,३५० रुपये क्विंटलपर्यंत बाजरीला भाव मिळत आहे. सोयाबीन आणि मका या शेतमालाची प्रत पाहून व्यापारी माल खरेदी करीत असल्याने या शेतमालाचे भाव दरदिवशी १०० रुपयांनी कमी किंवा जास्त होत असल्याचे दिसून आले.
सध्या सोयाबीन ३,१०० ते ३,२०० रुपये आणि मका १,३०० पासून १,४५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जात आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला ३,१०० ते ३,२०० रुपये प्रतिक्विंटल, मक्याला १,४५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. जेथे ५० पोत्यांचे उत्पादन अपेक्षित आहे तेथे २० ते २५ पोती उत्पादन होत आहे. बाजरीला येथे २,२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या बुधवारी येथे ४४ पोती बाजरीची आवक झाली भाव साधारणत: १,९९९ ते २,३५० रुपये क्विंटलपर्यंत होते. सरासरी २,३०० रुपयांपर्यंत भाव होता.
हरभऱ्याला ३,६२१ ते ३,६९० रुपये क्ंिवटलपर्यंत भाव मिळाला. मुगाची बुधवारी केवळ दोन पोत्यांची आवक झाली. मालेगावात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाचे पैसे रोखीने देण्यास सुरुवात झाली असल्याने याठिकाणी बाजरीची चांगली आवक आहे. चाळीसगाव, जि. जळगाव, नांदगाव तालुक्याचा परिसर आणि स्थानिक शेतकऱ्यांकडून या बाजारपेठेत बाजरी विक्रीसाठी आणली जाते. येथे बाजरीची किमान १,००० पोत्यांची आवक असून, भाव २,२०० रुपयांपर्यंत मिळत असल्याचे भुसार व्यापारी भिका कोतकर यांनी सांगितले. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने भविष्यातही भुसार मालाला चांगले भाव राहतील, असे कोतकर म्हणाले.