नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने कडक निर्बंध लागु केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारनंतर मोठा प्रतिसाद पहायला मिळाला. त्यामुळे व्यापारी आणि नागरीकांना देखील त्याचे गांभिर्य जाणवल्याचे दिसत आहे.
शहरासह जिल्ह्यात कोरेाना बाधीतांची संख्या वाढत असल्याने तसे तर मार्च महिन्यापासून स्थानिक पातळीवर प्रशासन आणि पोलीसांनी अनेक प्रकारचे निर्बंध लागु केले हेाते. त्यानंतरही कोरोनाचा उद्रेक वाढल्याने ५ एप्रिलपासून राज्यभरात निर्बंध लागु करण्यात आले. मात्र, त्यानंतर नाशिकमध्ये रस्त्यावरील वर्दळ फार कमी झालेली नव्हती. २२ एप्रिल पासून आणखी कडक निर्बंध लागु करण्यात आले. मात्र, त्यानंतरही शहरातील वातावरणात फरक पडला नाही. किराणा दुकान आणि भाजीबाजारात गर्दी कायम होती. अखेरीस आता १२ ते २२ मे दरम्यान बारा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. बुधवारी (दि.१२) वाजेपासून निर्बंध लागु करण्यात आल्याने तो पर्यंत बाजारात गर्दी होती. दुपारी वर्दळ कमी झाली आणि सायंकाळी बाहेर पडणाऱ्यांना पोलीसांनी छडी मार सुरू केला. त्यामुळे अनेक जण माघारी फिरले.
पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे दुपारनंतर शहरात वर्दळ अत्यंत कमी झाली होती. अनेक ठिकाणी सकाळी भाजी बाजार तसेच लसीकरणासाठी बाहेर जाणाऱ्यांची गर्दी होती. किराणा व्यवसायिकांना घरपोच माल पोहोचवण्याची अट असल्याने काहींनी माल पोहोचवला परंतु छेाट्या किरणा दुकानदारांकडे अशी सोय नसल्याने त्यांनी दुकाने बंदच ठेवणे पसंत केले. काही उद्योजकांनी कामगारांची तात्पुरत्या प्रमाणात निवास व्यवस्था करून देऊन कामे सुरू केल असली तरी बहुतांशी उद्योग बंद होते.