नाशिक (सुयोग जोशी): निवडणुका जवळ येऊ लागल्या की विरोधकांकडून आरोप करण्यास सुरूवात होते. त्यात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे तर नेहमीचेच झाले आहे. याला लोक थारा देणार नाही. म्हणूनच विरोधकांकडून आम्ही करत असलेल्या चांगल्या कामात बाधा आणण्याचे काम सुरू असल्याचा टोला जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. शनिवारी संदर्भ रूग्णाालयात बैठकीसाठी आलेल्या भुसे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, लाडकी बहिण योजनेसाठी आम्ही प्रत्येक महिलेला १५०० रूपये महिना देणार आहोत, म्हणजेच वर्षाचे झाले १८ हजार रूपये. संपूर्ण महाराष्ट्रासाठी या याेजनेचे पैसे वाटप करण्यासाठी शासनाला तब्बल ४५ हजार कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. आता विरोधक म्हणतात, १५०० रूपये नकोे तर प्रत्येकी दहा हजार रूपये वाटप करा. ते कोणत्या आधारे बोलता. मुळात शासनाचे बजेट किती आहे. याचाही अंदाज घेतला गेला पाहिजे. शासनाने मुलींना मोफत शिक्षण देण्याचा जिआर काढला असून तो लवकरच सर्वत्र पोहाेचवला जाईल. मराठा आरक्षणप्रश्नी भुसे म्हणाले, मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य करण्यात आल्या आहेत. लाखो कागदपत्राची छानणी करण्यात आली. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र दिली जात आहेत.
मुंबई महामार्गाबाबत लवकरच बैठक
नाशिक-मुंबई रस्त्यातील दुरावस्थेबद्दल बोलतांना भुसे म्हणाले, हा रस्ता लवकरात लवकर दुरूस्त करण्यात यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी येत्या तीन ते चार दिवसात नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यां समवेत बैठक घेणार आहोत. मागील वर्षी जशा उपाययोजना करण्यात आल्या, तशाच यावेळीही करू. या रसत्यावर पुलांचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्तयांचेही काम सुरू असल्याने अडथळे येत आहे. जड ट्रेलरलाही या मार्गावरून जातांना विशिष्ट वेळ वगैरे देण्याबाबत एकत्र बैठकीत निर्णय घेऊ. नोव्हेंबरपर्यंत समृद्धी महामार्गाचेही काम मार्गी लागेल असे भुसे म्हणाले.