नाशिक : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या गणरायाचे आगमन घरोघरी झाले होते. गेल्या दहा दिवसांपासून शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. सर्वत्र उत्साह व चैतन्य पहावयास मिळत होता. गणेश भक्तांकडून सकाळ-संध्याकाळ आरती केली जात होती. चौकाचाकांमध्ये सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज रविवारी (दि.२२) अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घालत लाडक्या बाप्पाला भक्तांकडून भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. सालाबादप्रमाणे पारंपरिक पद्धतीने दुपारी १२ वाजता गणेश विसर्जन मिरवणूक वाकडी बारव येथून काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी भद्रकाली पोलीस ठाण्याकडे सुमारे २१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केला आहे. विसर्जन मिरवणूक मार्गाची पोलिसांकडून पाहणी पूर्ण करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावरील सर्व प्रकारचे अडथळे दूर करण्याच्या सूचना पोलिसांनी महापालिका, महावितरण विभागाला केल्या आहेत.रात्री उशिरापर्यंत भाविकांचा महापूरलाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी व सार्वजनिक गणेशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी मागील दोन दिवसांपासून शहरात भाविकांची गर्दी उसळत आहे. शुक्रवारीदेखील भाविकांच्या गर्दीने रस्ते फुललेले होते तसेच शनिवारी संध्याकाळी ७ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत शहरातील शालिमार, रविवार कारंजा, मेनरोड, भद्रकाली, पंचवटी, जुने नाशिक, कॉलेजरोड आदी भागात मंडळांचे देखावे बघण्यासाठी आबालवृद्धांची मोठी गर्दी लोटली होती.
लाडक्या बाप्पाला आज निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 1:21 AM