नाशिक: देशासाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना स्थानिकांकडून जमिनीच्या वादावरून त्रास देण्याचे प्रकार अनेकदा समोर आलेले आहेत. सर्वच प्रकरणे दाखल होत नसली तरी अशाप्रकारे त्यांना वेठीस धरले जात असल्याचे गंभीर प्रकार होत असल्याने अशा कुटुंबीयांना पुढे येण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयाने केले आहे. येत्या ३१ रोजी त्यांना त्यांच्या अडचणी मांडण्याची संधी देण्यात आलेली आहे.
देशाचे संरक्षण आणि सन्मानासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना आपल्या घरादारापासून दूर राहून देशसेवा करावी लागते. गाव, खेड्यातील जवान देशासाठी लढत असताना त्यांच्या कुटुंबीयांना मात्र अनेकदा अनेक स्थानिकांच्या त्रासाचा सामना करावा लागतो. यामध्ये जमिनीचे वाद सर्वात अधिक असून जमीन बळकाविण्याचे प्रकार घडत असल्याचीही चर्चा होत आहे. जिल्हा सैनिक कार्यालयाकडे जिल्ह्यात अशाप्रकारच्या दरमहा किमान ८ ते १० तक्रारी प्राप्त होत असतात.
केवळ सेवेत असलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांनाच अशा प्रसंगाला सामोरे जावे लागते असे नव्हे तर माजी सैनिकांना देखील अडचणींचा सामना करावा लागतो. देशातील जवानांच्या दृष्टीने असे प्रकार घडणे योग्य नसल्याने त्यांना न्याय देण्यासाठीची माेहीम जिल्हा समितीने सुरू केली आहे. जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक मंडळातर्फे बैठकीचे आयोजन केले जाते. त्यानुसार येत्या ३१ रोजी नाशिकमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी सैनिक व सैनिकांच्या वीरपत्नी यांना गाव गुंडांकडून होणारा त्रास किंवा जमिनीवरील अतिक्रमण, शेतीसाठीचे पाणंद यासाठी होणारी अडवणूक यामुळे त्यांना अनेक अडचणी येतात. या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कार्यालयात संबंधितांनी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी ओंकार कापोले यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिक तसेच वीरपत्नी यांच्या अडचणींबाबत बैठक होणार आहे. त्याअनुषंगाने तक्रारी सादर करण्याबाबतचे आवाहन संबंधितांना करण्यात आले आहे.