त्र्यंबकेश्वर : आखाड्याचे अखिल भारतीय अध्यक्ष व नुकतेच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारलेले योगी आदित्यनाथ यांच्या पुढाकाराने २०१६च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर येथील गोरक्षनाथ मठ अर्थात नाथ आखाड्याचा कायापालट झाला आहे. आदित्यनाथ यांच्या निवडीचे नाथ संप्रदायासह साधूमहंतांनी स्वागत केले आहे. त्र्यंबकेश्वर येथील गुरु गोरक्षनाथांच्या मंदिराचे सुंदर आणि आकर्षक बांधकाम करण्यात आले आहे. मंदिराचे उदघाटन व गुरु गोरक्षनाथ व नवनाथमूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला होता. या कार्यक्र माची तयारी करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे त्र्यंबकेश्वर येथे तीन ते चार दिवस वास्तव्य होते.या कार्यक्रमाच्या वेळी मी योगींसमवेत होतो, असे सुरेश गंगापुत्र यांनी सांगितले. त्यावेळी योगी गंगापुत्र म्हणाले की, नाथ संप्रदायात त्र्यंबकेश्वरला फार महत्त्व आहे. कदलीचा राजा दर बारा वर्षांनी सिंहस्थ काळात येथेच निवडतात. त्र्यंबकेश्वरच्या पिरजीची निवड येथेच करतात. अनुपान शीला येथेच आहे. तर कदली यात्रेचा प्रारंभदेखील त्र्यंबकेश्वरपासून होत असल्याने त्र्यंबकेश्वरला विशेष महत्त्व आहे, असे त्यांनी सांगितले. अनुपान शीलेचा विकास करायचा मानस योगी त्यांनी बोलून दाखविला होता. त्याप्रमाणे काम प्रगतिपथावर आहे. त्र्यंबकेश्वर ट्रस्टतर्फे सचिन्द्र पाचोरकर यांच्या हस्ते योगी आदित्यनाथ यांचा सत्कार करण्यात आला होता. (वार्ताहर)
योगींच्या पुढाकारानेच गोरक्षनाथ मठाचा कायापालट
By admin | Published: March 22, 2017 12:51 AM