वणीतील सभेत मोदी सरकारवर टीका, कॉँग्रेसची विचारधारा महाराष्ट्राचीच नाशिक : नरेंद्र मोदी यांचे भाजपा सरकार हे गोरगरीब जनतेसाठी नव्हे, तर केवळ श्रीमंत आणि उद्योगपतींसाठी आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील या गरीब आणि दुबळ्या जनतेने मतपेटीतून आपली ताकद भाजपा सरकारला दाखवा आणि महाराष्ट्रात पुन्हा गरिबांचेच सरकार आणा, असे आवाहन कॉँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले. कॉँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांची वणी (तालुका दिंडोरी) येथे सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर चौफेर टीका केली. जनतेला स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यांचे सरकार गोरगरिबांसाठी नव्हे, तर उद्योगपतींसाठी आहे. कॉँग्रेसच्या काळात आधार योजनेद्वारे सरकारचा पैसा मनरेगा आणि अन्य योजनांतून अनुदानाच्या स्वरूपात थेट नागरिकांच्या खात्यात वर्ग केला जात होता. आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात जनतेचा पैसा थेट उद्योगपतींच्या खात्यात जमा होत आहे. महाराष्ट्राची आणि फुले, शाहू, आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांची जी विचारधारा होती तीच कॉँग्रेसची आहे. गोरगरीब जनतेला सुरक्षा आणि विकासात पुढे नेण्याचेच धोरण कॉँग्रेस सरकारच्या काळात राबविले गेले. दुष्काळात महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. आता कांदा उत्पादकांना निर्यातबंदीमुळे भाव कोसळल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कॉँग्रेस सरकारने ६ लाख लोकांना मोफत औषधे व आरोग्य सुविधा पुरविल्या. मोदी सरकारच्या काळात कर्करोग आणि मधुमेहाची हजाराच्या घरातील औषधे लाखात गेली आहेत. चीनच्या राष्ट्रपतींसोबत हिंदुस्थानात लडाखमध्ये चिनी सैन्यही घुसले. पाकिस्तानकडून भारतीय सैन्यावर गोळीबार सुरूच आहे. आधी अच्छे दिन आयेंगे म्हणणारेच आता ‘जल्दी सब ठीक हो जाएगा’ म्हणत आहेत. जनतेची फसवणूक करून सत्तेवर आलेल्यांना त्यांची जागा दाखवा आणि भाजपाला गोरगरीब व सर्वसामान्यांची ताकद दाखवून द्या, महाराष्ट्रात गरिबांचेच सरकार हवे, असे प्रतिपादन त्यांनी उपस्थिताना केले. यावेळी राहुल गांधी यांनी जिल्'ातील कॉँग्रेसच्या सर्व उमेदवारांची नावे वाचत त्यांना व्यासपीठावर बोलवित उपस्थित जनतेला त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.(प्रतिनिधी) इन्फो.. मोदी को आपको ही हटाना हंै उपस्थितांपैकी कार्यकर्त्यांनी ‘मोदी हटाव, मोदी हटाव’चा नारा दिल्यावर राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे पाहून ‘अब आपको ही मोदी को हटाना हंै’ असे सांगताच हशा पिकला.
उद्योगपतींचे नव्हे गोेरगरिबांचे सरकार हवे : राहुल गांधी
By admin | Published: October 10, 2014 10:41 PM