सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील गोरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तालुक्यातील पहिल्या ‘टॅब स्कूल’चा लौकिक लाभला आहे. शिक्षक वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोरे कुटुंबीयांनी शाळेला टॅब भेट दिले.आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते टॅबचे वितरण झाले. जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, कोपरगाव पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब राहणे, राज्य शिक्षक संघाचे मार्गदर्शक सोमनाथ तेल्हुरे, शालेय समितीचे अध्यक्ष गुलाब गोरे, सरपंच शिवाजी शिंदे, उपसरपंच शिवनाथ गोरे, भाऊसाहेब शिंदे, अण्णा गोरे, संदीप लेंडे, दिनकर गोरे, मच्छिंद्र गोरे, बाळासाहेब गोरे आदी उपस्थित होते.गोरे कुटुंबीयांच्या दातृत्वातून शाळा डिजिटल बनली आहे. पुढील काळात डिजिटल शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी यावेळी सांगितले. गोरे कुटुंबीयांच्या उपक्रम प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.शाळेतील मुलांची संख्या अवघी १६ आहे. मात्र नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर व कमी पटसंख्या असल्याने सुविधा पुरवण्याकडे तसा फारसा कल नाही. तथापि, गोरे कुटुंबीयांनी १० टॅब उपलब्ध करून दिल्याने दोन मुलांत एक टॅब सध्या दिला जात आहे. अजून सहा टॅब उपलब्ध करण्याचे प्रयत्न मुख्याध्यापक प्रभाकर गुरकुले, उमेश खेडकर यांनी सुरू ठेवला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे दोन ते तीन किलो वजनाचे दप्तर होते. टॅब मिळाल्याने हे ओझेही कमी होऊन विद्यार्थी डिजिटल पद्धतीने धडे गिरवणार आहेत. त्यासाठी विविध विषयांचे अॅपही मिळविले जात आहेत.शिक्षकी पेशा केलेल्या नामदेव केरू गोरे यांनी मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मोठी धडपड केली. प्रसंगी खिशातून खर्च करून सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या पश्चात हाच वारसा त्यांच्या कुटुबीयांनीही सुरू ठेवला आहे. नामदेव गोरे यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त इतर कोणताही खर्च करण्याऐवजी त्यांची मुले बाळासाहेब, संतोष व राजेंद्र गोरे यांनी शाळेला टॅब प्रदान केले.
गोरेवाडी शाळेला मिळाला ‘टॅब शाळा’ होण्याचा लौकिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 5:54 PM