संजय शहाणे -
कैलासनगरमधील एका अल्पवयीन शाळकरी मुलीला बळजबरीने पाच मजली इमारतीवर घेऊन जात गच्चीवरून खाली ढकलून दिल्याची घटना गुरूवारी (दि.१) उघडकीस आली. या घटनेतील संबंधित मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. विद्या हनुमान काळे (१६) असे या मुलीचे नाव होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित आरोपी विनायक सुरेश जाधव (१८) यास बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान, विद्याने दहावीची परीक्षा दिली होती, शुक्रवारी (दि.२) निकाल जाहिर झाला. यात तिला ५७टक्के गुण मिळाले. हा निकाल बघण्यापूर्वीच तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांसह परिसरातील रहिवासी व शाळकरी मैत्रीणींनी हळहळ व्यक्त केली.
मूळ परभणी येथील हनुमान शाहूराव काळे हे वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील कैलासनगर येथे ते मागील तीन वर्षांपासून भाडेततत्वावर खोली घेऊन कुटुंबियांसह राहत आहेत. बुधवारी (दि.३१) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास काळे दापत्य भाजीपाला घेण्यासाठी गेले होते. रात्री आठ वाजता पाच मजली इमारतीच्या गच्चीवरून त्यांच्यासमोर मुलगी विद्या कोसळली हे दृश्य पाहून आई सविता यांनी टाहो फोडला. गंभीर जखमी झालेल्या विद्याला येथील एका रहिवाशाच्या कारमधून लेखानगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान गुरुवारी (दि१) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी विद्याला मयत घोषित केले होते. याप्रकरणी तिचे वडील हनुमान काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घोटीमधून पोलिसांनी घेतले ताब्यात -इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्याह्यदे यांनी या खूनाच्या गुन्ह्याचा तपास सुरू करण्याचे आदेश दिले. गुन्हे शोधक पथकाचे सागर परदेशी, जावेद खान, मुश्रीफ शेख, योगेश जाधव यांनी संशयित विनायक जाधवच्या (१८,रा.जाधव गल्ली, घोटी) मुसक्या बांधल्या. इंदिरानगर पोलीस ठाण्यात दुपारी अडीच वाजता त्यास अटक करण्यात आली. संशयित विनायक यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास येत्या मंगळवारपर्यंत (दि.६) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
खुनाचे गुढ कायम...!अल्पवयीन विद्याला इमारतीवर बळजबरीने घेऊन जात गच्चीवरून संशयिताने का ढकलून दिले? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या खूनाच्या घटनेमागील गुढ अद्याप कायम असून संशयित विनायकसोबत त्याचा दुसरा साथीदारदेखील घटनास्थळी होता का? याचाही तपास आता पोलिस करत आहेत. पोलिस कोठडीत त्याची कसून चाैकशी केल्यानंतर सत्य बाहेर येण्याची श्यक्यता आहे.