नांदगाव- नांदगाव शहर व परिसरात सध्या ‘आला रे आला बिबट्या आला’ अशा अफवांचे पीक मोठ्या प्रमाणावर आल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात बिबट्याने मानवी वस्तीवर केलेल्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूची धास्ती तालुक्यात पसरली आहे. ‘तो दिसला’ खरा की अफवा ! यातली सीमा रेषा अस्पष्ट असल्याने जीवाच्या भीतीने लोक घाबरलेले आहेत.साकोरे कि साकुर कि साकोरी नेमका कुठे दिसला याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मालेगांव व चाळीसगाव तालुक्यातील साकुर, साकोरी, तळवाडे, ही गावे व नांदगांव तालुक्यातील साकोरा ,त् ाळवाडे या गावांच्या नावातले साम्य, यामुळे अफवामध्ये भर पडत आहे. काही महिने आधी मन्याड नदीच्या किनारी आठ महिन्यांचा बिबट्या सापडला होता. या सर्व घटनांचा बिबट्याचे वास्तव्य नजीक असावे असा संदर्भ जोडला जात आहे. काही पालक थेट शाळेत जाऊन पाल्यांना घरी घेउन आले.शुक्र वारी दुपारी १२ वा गुरु कृपानगर मध्ये बिबट्याने एक मुलाला उचलले असे सांगण्यात येत होते. रात्री शहराला लागून असलेल्या हनुमान नगर, श्रीरामनगर व गुरु कुल पॉलीटेक्नीक या भागात बिबट्या फिरतो आहे. ठिकठिकाणी घोळक्यात अशा चर्चा सुरु होत्या. कोणाला तो दिसला? यातला प्रत्यक्षदर्शी समोर येत नसल्याने कर्णोपकर्णी वार्तांमुळे दहशत निर्माण झाली आहे.वनविभागाचे कर्मचारी ‘ बिबट्या दिसल्याचा ’ निरोप आला की तातडीने संबंधित ठिकाणी जात आहेत. वनविभाग परीक्षेञ अधिकारी विक्र म आहीरे यांच्या मतानुसार आतापर्यंतच्या वार्ता या अफवा आहेत.
आला रे आला बिबट्या आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 2:16 PM