नाशिक : मनसेतील पदाचा राजीनामा देऊन भाजपाच्या कुंपणावर असलेल्या माजी आमदार वसंत गिते यांनी अखेर समर्थकांसह नव्या पक्षात प्रवेश केला. गिते यांच्या बरोबरच अनेक विद्यमान नगरसेवक आणि पदाधिकारीदेखील भाजपात जाणार असल्याने मनसेला खिंडार पडणार अशी चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात मात्र मोजक्या सवंगड्यांनीच त्यांना साथ दिल्याने स्थानिक स्तरावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. नाशिकमध्ये मनसेचे सर्वेसर्वा असलेले वसंत गिते यांनी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच अन्य पक्षात प्रवेश करणार हे सर्वश्रुत होते. तथापि, मनसेतील किती पदाधिकारी आणि नगरसेवक त्यांच्यासमवेत भाजपात प्रवेश करतात, याविषयी उत्सुकता होती. राज ठाकरे यांनी मध्यंतरी नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर गिते यांच्या संपर्कात असलेल्यांची यादीदेखील मागविली होती, तर स्थानिक पातळीवर नगरसेवकांनी पक्ष सोडू नये यासाठी प्रयत्न केले जात होते. गिते यांचा भाजपा प्रवेश म्हणजे एक प्रकारे मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन असेल असे मानले जात असताना त्यांनी निवडक माजी पदाधिकाऱ्यांसह प्रवेश केला. यात मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश दायमा, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, माजी नगरसेवक रणजित नगरकर, संजय नवले, कामगार सेनेचे देवकिसन पारिख, मनविसे शहराध्यक्ष हृषिकेश चौधरी, अजिंक्य गिते, जय कोतवाल, अनिल वाघ यांचा समावेश आहे. त्यामुळे गिते यांच्यासमवेत अनेक नगरसेवक जातील आणि मनसेला खिंडार पडेल अशा सुरू असलेल्या चर्चेला विराम मिळाला.
मोजक्या संवगड्यांसह गिते भाजपात
By admin | Published: January 14, 2015 1:12 AM