नाशिक - गणपती बाप्पांच्या आगमनानंतर सर्वांनाच उत्सुकता असते ती गौराईंच्या आगमनाची. बाप्पांच्या प्रतिष्ठापनेनंतर ४ दिवसांनी गौराईंचं आगमन घरोघरी करण्यात येते. त्यानुसार, आज सकाळपासून गौरींच्या आगमनाची तयारी सुरू झाली असून काहींनी गौरींची पूजाही केली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात तृतीयपंथीयांनीही गौरींची मनोभावे पूजा करत स्थापन केली. गणेश उत्सवामध्ये महालक्ष्मी बसवण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आली असून येवल्यातील आराधी, जोगती, किन्नर हे गेल्या 5 वर्षापासून महालक्ष्मीची स्थापना करत आहेत.
परंपरेनुसार या वर्षी देखील मोठ्या थाटामाटात त्यांनी घरामध्ये महालक्ष्मी विराजमान झाली आहे. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होत असल्याने उत्साहाचे वातावरण सर्वत्र दिसून येत असून आज जेष्ठ गौरी महालक्ष्मी माता मुलाबाळांसह तीन दिवसांसाठी माहेरी येते. येवल्यातील किन्नर, आराधी, जोगती कुटुंबाने आज मोठ्या थाटामाटात आपल्या घरी महालक्ष्मीची स्थापना केली आहे. गेल्या 5 वर्षांपासून हे किन्नर कुटुंब आपल्या घरी महालक्ष्मीची स्थापना करत असून यावेळी आकर्षक आरस सजावट करत महालक्ष्मी विराजमान झाल्यानंतर कुटुंबीयांनी पूजाअर्चा व आरती केली.
महालक्ष्मीच्या सणाची आम्हाला प्रतिक्षा असते, दरवर्षी थाटामाटात आम्ही गौराईचं आगमन करतो, या तीन दिवसांत मोठा उत्साह आणि आनंद आम्हाला मिळतो, असे येथील कुटुंबीयांनी म्हटले. दरम्यान, गणेश चतुर्थीच्या चार दिवसानंतर महालक्ष्मीचे आगमन होत असते.