नाशिक : आपले पालनपोषण करणारी व्यक्ती माता असते. पृथ्वी, तुळशीप्रमाणे गोमाताही मानवाची माता असून, तिच्यात असलेल्या अलौकिक प्राणशक्तीमुळे अनेक आजार बरे होत असल्याचा दावा आरोग्य अभ्यासक उत्तम महेश्वरी यांनी केला.नंदिनी गोशाळेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प महेश्वरी यांनी ‘पंचगव्य चिकित्सा’ विषयावर गुंफले. शंकराचार्य संकुलात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर नेमीचंद पोद्दार, शिल्पा मेहता, महेश पाटील, परमेश्वर नलावडे, किशोर कराळे उपस्थित होते. महेश्वरी म्हणाले, अॅलोपॅथी शाखेच्या डॉक्टरांना अहंकार असतो. त्यामुळे या देशाला आयुर्वेदाची समृद्ध परंपरा असूनही ते त्यापासून काही शिकू शकत नाहीत. मुळात अॅलोपॅथी हे शास्त्रच नाही. मानवी शरीराचे एकक प्राण आहे. शरीरातील प्राणशक्तीचे प्रमाणच त्या व्यक्तीचे सुदृढत्व ठरवते. अॅलोपॅथीला प्राणच माहीत नाही. त्यांचा सगळा भर रसायनांवर असतो. त्यामुळे लोकांनी देशी उपचारांकडे वळायला हवे. गायीत प्राणशक्ती असून, वारंवार गर्भपात होत असलेल्या महिलेने दूध देणाऱ्या सात गायींभोवती १०८ फेऱ्या मारल्यास गर्भपात होणे थांबत असल्याचा दावाही महेश्वरी यांनी केला. गायीपासून मिळणारे पंचगव्य आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमात डॉ. बन्सीलाल जैन यांनी अनुभव कथन केले. वसंत खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्यानमालेत उद्या (दि. २९) सायंकाळी ६.३० वाजता श्री महंत वेणाभारतीजी महाराज यांचे ‘मोक्षाची पहिली पायरी : गोसेवा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. (प्रतिनिधी)
गोमातेत अलौकिक प्राणशक्ती
By admin | Published: December 28, 2015 11:56 PM