नाशिक : शिक्षकांच्या बदल्या होणार नाही, असे चित्र असतानाच ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या नवीन शासन निर्णयान्वये मात्र शिक्षकांच्या आपसी (परस्पर संमती) बदल्यांना शासनाने हिरवा कंदील दाखविल्याने बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याबाबत १८ मे २०१५ च्या नवीन शासन निर्णयान्वये मागील वर्षीच्या १५ मे २०१४ च्या शासन निर्णयात किरकोळ स्वरूपात फेरफार करण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांच्या पदनिश्चितीबाबत कार्यवाही पूर्ण होत नाही. व मा. न्यायालयाकडून जैसे थे परिस्थितीबाबत निर्णय होत नाही. तोेपर्यंत आपसी बदल्यांव्यतिरिक्त तर कोणत्याही प्रशासकीय, विनंती बदल्या, आंतरजिल्हा बदल्या करण्यात येऊ नयेत, असे निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे मार्चनंतर झालेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे १८ मे २०१५ पूर्वी ज्या जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांच्या आपसी (अंतर्गत) बदल्या व्यतिरिक्त जिल्हांतर्गत / आंतर जिल्हा बदल्या झाल्या असल्यास या बदल्या स्थगित करण्यात याव्यात, असे या नवीन शासन निर्णयात म्हटले आहे. शासनाच्या या नवीन निर्णयामुळे शिक्षकांना आपसी बदल्या करण्यास मोठा वाव मिळणार असून, विनंती स्वरूपात बदली करण्यास इच्छुक असलेल्या शिक्षकांना या शासन निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
ॅशिक्षकांच्या आपसी बदल्यांना हिरवा कंदील शासन निर्णय
By admin | Published: May 20, 2015 1:35 AM