नाशिक : केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष निश्चित करताना प्रत्येक तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान गृहीत धरण्याची अट निश्चित केली आहे, मात्र गेल्या चौदा वर्षांपासून राज्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान ‘जैसे थे’ असल्याने राज्य सरकारने यंदापासून पर्जन्यमानात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांच्या पर्जन्यमानात मोठी वाढ करण्यात आली तर जिल्ह्याच्या सरासरीमध्ये मात्र काही मिलीमीटरची घट दर्शविली आहे.गेल्या वर्षी राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु केंद्र सरकारने दुष्काळाची व्याख्या ठरवितांना जे काही निकष ठरवून दिले आहेत ते पाहता अनेकदा राज्य सरकारची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे राज्याच्या महसूूल व वन विभागाने राज्यातील तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान निश्चित करण्यात आले असून, यापूर्वी चौदा वर्षांपूर्वी सरासरी पर्जन्यमान निश्चित करण्यात आली होती. त्यात आता नव्याने बदल करण्यात आला आहे. हा बदल करताना सन १९६१ ते २०१० या काळात तालुकानिहाय झालेल्या पावसाची सरासरी विचारात घेण्यात आली आहे.पुण्याच्या मोसम विभागाने पर्जन्यमान निश्चित केले असून, यापुढे राज्य, जिल्हा व तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमान नवीन निर्णयानुसार गृहीत धरण्यात यावे, असे शासनाचे आदेश आहेत.या बदलामध्ये पेठ, त्र्यंबक, इगतपुरी या पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यांच्या पर्जन्यमानात घट दाखविण्यात आली असून, कायमदुष्काळी म्हणून गणल्या गेलेल्या अन्य तालुक्यांच्या पर्जन्यमानात वाढ दर्शविण्यात आली आहे.
शासनाने बदलले वार्षिक पर्जन्यमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:34 AM