नाशिक : जीएसटीपूर्व कामांवर लादलेला कर तसेच राज्य सरकारने निविदा धोरणात आमूलाग्र बदल केल्याने सरकारी कंत्राटदारांच्या संघटनांमध्ये नाराजी असून, राज्य सरकार सुधारणा करण्यास तयार नसल्याने आता आंदोलनाच्या निर्णयाप्रत संघटना आल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि.२५) नाशिकमध्ये विविध संघटनांची बैठक होणार असून, त्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. शहरातील गंगापूररोडवरील सोमेश्वर लॉन्स येथे दुपारी १ वाजता ही बैठक होणार आहे. बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया, हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना मंजूर संघ अशा विविध संघटनांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. १ जुलैपासून केंद्र सरकारने जीएसटी लागू केला आहे. मात्र राज्य सरकारने त्यापूर्वी सुरू असलेल्या सर्व सरकारी कामांवर तो लागू केला आहे. त्यामुळे जीएसटीचा वाढीव भुर्दंड कंत्राटदारांना सोसावा लागणार आहे. त्याच्या विरोधात राज्यभरातील कंत्राटदारांनी सर्व शासकीय आणि निमशासकीय निविदांवर बहिष्कार घालूनही सरकार ऐकण्यास तयार नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे कंत्राटदारांचे बांधकाम विभागाकडे होणाºया नोंदण्या रद्द करण्याच्या निर्णयालाही विविध संघटनांचा विरोध असल्याचे विलास बिरारी यांनी सांगितले.
सरकारी कंत्राटदार आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 1:10 AM