लोकमत न्यूज नेटवर्क
नामपूर : बागलाण तालुक्यातील काकडगाव येथील शेतकऱ्यांनी सोसायटीच्या कार्यालयात एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली सरसकट कर्जमाफी योजना फसवी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करून या कर्जमाफीचा निषेध केला आहे. ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. प्रत्यक्षात डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा हा प्रकार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या कर्जमाफीत जाचक अटी व नियम लावलेले आहेत. या योजनेत प्रत्येक गावात बोटावर मोजण्याइतकेसुद्धा शेतकरी बसलेले नाहीत. ज्या शेतकऱ्यांचे २०१२ पूर्वी कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिलेला नाही. यामुळे सन २००८ च्या कॉँग्रेस सरकारच्या काळात जे शेतकरी वंचित राहिले आहेत ते पुन्हा आजच्या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. वास्तविक हेच शेतकरी खऱ्या अर्थाने गरीब व गरजू आहेत. अशा शेतकऱ्यांचा आकडा खूप मोठा आहे. तसेच पोल्ट्री, विहीर, मोटार, गृहकर्ज आदींना या योजनेतून बाद केले आहे. याव्यतिरिक्त २०१६ हे वर्ष अंतिम थकबाकीचे वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ २५ हजार रुपये सूट देण्यात येणार आहे. मात्र यासाठी ३० जूनअखेर सर्व कर्जाची रक्कम भरावी लागणार आहे. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज रक्कम असेल तर वरची रक्कम रोख भरावी लागणार आहे. या कर्जमाफीतून शासकीय कर्मचाऱ्यांनाही वगळण्यात आले आहे. अशा कर्जदारांची संख्या मुळात कमी आहे. सरसकट कर्जमाफीचा शब्द वापरून त्यात एवढे निकष लावल्यामुळे ही कर्जमाफी नेमकी कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. आगामी काळात सरकारने कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्यास संपूर्ण गावकरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कार्यालयातच आमरण उपोषण करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी सोसायटी अध्यक्ष रामू अहिरे, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, तंटामुक्त अध्यक्ष राजाराम पाटील, प्रगत शेतकरी पंडित पाटील, सरपंच निंबा सोनवणे, संचालक अजित अहिरे, शिवाजी अहिरे, सुरेश अहिरे, नंदलाल अहिरे, विनोद पाटील, विलास अहिरे, देवराव अहिरे, प्रशांत पवार, दादाजी सोनवणे, अभिमन पवार, बाजीराव अहिरे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. चौकट . सरसकट कर्जमाफीसाठी दिलेल्या अटी व नियम जाचक आहेत. अजून शासनाचे परिपत्रक प्राप्त न झाल्यामुळे नेमका लाभ कोणाला मिळेल, हे सांगणे आज तरी कठीण आहे. हेमंत भामरे, निरीक्षक, जिल्हा बॅँक, नामपूर फोटो ओळी . संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण शेतकरी आज शासनाच्या भूलथापांना बळी पडत असून, प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे दिसत आहे. मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून दिशाभूल करीत असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे. फसव्या सरसकट कर्जमाफीचा निषेध करण्यात आला. येत्या आठ दिवसात सरकारने वंचित शेतकऱ्यांचा विचार केला नाही तर यापुढे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही राजकीय नेत्याला काकडगावात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.