सटाणा : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यास शासन विलंब करीत असून, तिसऱ्या सूचीत समावेश करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बागलाण तालुका धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षण कृती समितीच्या वतीने राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील धनगर समाजाच्या वतीने अहल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून टिळक रोडने राज्य महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील चौकात अचानकपणे रास्ता रोकोस प्रारंभ केला. आंदोलनाप्रसंगी धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, कृती समितीचे अध्यक्ष प्रा. मधुकर नंदाळे, युवा धनगर समाज सेनेचे प्रदेश अध्यक्ष अरुण शिरोळे, दीपक नंदाळे, नगरसेवक भारत काटके यांची भाषणे होऊन राज्य शासनाचा धिक्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक भागवत जायभावे यांना निवेदन देण्यात आले.राज्य शासनानातील जबाबदार मंत्री आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी या मागणीचा विरोध करीत असून, तिसऱ्या सूचीचा जो निर्णय घेतला आहे तो आम्हा समाजबांधवांना मान्य नसल्याने आम्ही निषेध करीत आहोत. असे निवेदनात म्हटले आहे. रास्ता रोकोप्रसंगी नगरसेवक भारत काटके, अनिल जाधव, योगेश शिरोळे, प्रा. मधुकर नंदाळे, अरुण शिरोळे, मुन्ना धाबळे, नीलेश पाकळे, दीपक पाकळे, अनिल पाकळे, नागेश पाकळे, आप्पा नंदाळे, दामोधर नंदाळे, विनोद नंदाळे, काशीनाथ ठोंबरे, बाळासाहेब शिरोळे, यशवंत नंदाळे, राकेश सोनवणे, बापू फटांगडे आदिंसह कार्यकर्र्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाप्रसंगी सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत जायभावे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.चांदवड येथे आंदोलनचांदवड येथे सकाळी १२ ते १ वाजेपर्यंत मुंबई-आग्रा महामार्ग चौफुलीवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले आंदोलन सुमारे एक तास सुरु होते, भरपावसातही धनगर समाजाचे नेते व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. चौफुलीवर नेत्यांची सभा झाली, रास्ता रोको नंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलीस व्हॅनमधून पोलीस ठाण्यात आणले व नंतर त्यांची जामिनावर मुक्तता केली. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शिवाजी ढेपले , साईनाथ गिडगे, बापू बिडगर, भाऊलाल तांबडे यांनी केले. धनगर समाजाचे नेते आंदोलन करणार म्हणून सकाळी ११ वाजेपासूनच नायब तहसीलदार नितीन गर्जे, मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस दल, दंगा पथक, अग्निशमन दल, सोमा कंपनीचे कर्मचारी चांदवड पेट्रोलपंप चौफुलीवर तैनात करण्यात आले. धनगर समाजाचे नेते व कार्यकर्ते सकाळी ११.४५ वाजता चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलपासून निघून मोर्चाने हातात पिवळे झेंडे, बॅर्नर, पिवळे टिळे लावून सरकारचा निषेध करीत घोषणा देत चौफुलीवर पोहचले. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी ढेपले, भाऊलाल तांबडे, अॅड. गंगाधर बिडगर, पारखेसर, खंडेराव पाटील, डॉ. जाधव डॉ. मनोज पगारे, शंकर भंडागे, साईनाथ गिडगे, बापू बिडगर व धनगर समाज नेते व कार्यकर्त्याची भाषणे झालीत. चांदवड तालुक्यातील धनगर समाजबांधव उपस्थित होते. आंदोलकांना अटक करून नंतर सोडुन देण्यात आले. ( वार्ताहर )