मालेगाव : मालेगाव कृउबाच्या मुंगसे कांदा खरेदी केंद्रावरील जय भोलेनाथ ट्रेंडर्सचे व्यापारी शिवाजी सूर्यवंशी या कांदा व्यापा-याकडे शेतकºयांचे कांदा विक्रीपोटी अडकलेले पैसे वसुल करण्यासाठी शासनाने त्यांच्या मालकीची १ हेक्टर ८२ आर ५० गुंठे क्षेत्र शासन जमा केले आहे. या जमिनीचा लिलाव होऊन विक्रीतुन येणाºया पैशातुन शेतकºयांचे थकीत पैसे अदा केले जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे उपसभापती सुनिल देवरे व तहसिलदार ज्योती देवरे यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मुंगसे येथील कांदा खरेदी केंद्रावरील व्यापारी शिवाजी सूर्यवंशी यांच्याकडे शेतकºयांचे कांदा विक्रीपोटीचे पैसे बाकी आहेत. सूर्यवंशी यांची बांगलादेश येथील कांदा व्यापाºयाने फसवणूक केली आहे. शेतकºयांचे थकलेले पैसे परत मिळावे यासाठी बाजार समितीच्या पदाधिकारी व प्रशासनाने जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली होती. यानुसार जमीन महसुलच्या थकबाकीच्या वसुलीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. येथील अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी २५ मे रोजी तहसिलदारांना कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले होते. त्यानुसार तहसिलदारांनी २७ मे रोजी नोटीस बजावली होती. तसेच स्थावर मालमत्ता जप्तीचीही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत सूर्यवंशी यांची दुचाकी जप्त करण्यात आली होती. महसुलने दिलेल्या नोटीसीला व्यापारी सूर्यवंशी यांच्या पत्नी सुरेखा सूर्यवंशी यांनी तुम्ही जर जमीन जप्त केली तर आत्महत्या करुन घेऊ असे उत्तर दिले होते. त्यानंतर महसुल प्रशासनाने जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली होती. त्यानुसार शुक्रवार दि. २२ रोजी मुंगसे शिवारातील गट क्रमांक ९१/१, ९१/२, ११२/२ अशा तिन्ही गटांवरील १ हेक्टर ८२ आर ५० गुंठे क्षेत्र जप्त केले आहे. या क्षेत्रावर सरकार जमा असा शेरा मारण्यात येणार आहे. ७७७ कांदा उत्पादक शेतकºयांचे २ कोटी ९० लाख ५४ हजार रुपये सूर्यवंशी यांच्याकडे घेणे आहे. सरकार जमा झालेल्या सूर्यवंशी यांच्या जमिनीचा लिलाव करण्यात येणार असून या लिलावाच्या पैशातुन शेतकºयांचे पैसे अदा केले जाणार आहे. यातुनही शेतकºयांचे पूर्ण पैसे अदा झाले नाही तर सूर्यवंशी यांना साक्षीदार असलेले उमराणे येथील व्यापारी प्रल्हाद अग्रवाल यांच्याही जमीन व प्लॉटवर जप्तीची कारवाई प्रस्तावित आहे. इतर ठिकाणच्या मिळकतींचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती उपसभापती देवरे यांनी दिली.
मुंगसेच्या व्यापाऱ्याची जमीन सरकार जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:18 AM