पंचवटी : शेतमाल लिलावातील आडत ही खरेदीदार व्यापाऱ्यांकडून वसूल करावी, असे आदेश पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी दिल्याने त्या आदेशाला व्यापारी व आडते यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. शासनाने दिलेले आदेश अन्यायकारक असून, त्या विरोधात लढा देण्यासाठी व्यापारी व आडते यांनी एकत्र येऊन शासन जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत कोणतेच व्यवहार न करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. दरम्यान, दुपारी आडत वसुलीच्या आदेशाला पणन मंत्र्यांनी पंधरा दिवस स्थगिती दिल्याचे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी जाहीर केल्यानंतर बाजार समितीत पारंपरिक पद्धतीनेच व्यवहार सुरू झाले. सकाळी पेठरोड येथील नवरंग मंगल कार्यालयात श्याम बोडके यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी व आडते यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला संचालक अनिल बूब, चंद्रकांत निकम, बाळासाहेब कर्डक, सुरेश ढिकले, नितीन लासुरे, उमापती ओझा, मनोज नलावडे, नितीन लासुरे, सुकदेव पाटील आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी व्यापारी तसेच आडत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले व त्यानंतर व्यवहार न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शासनाने शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून आडत वसूल करण्याबाबतचा घेतलेला निर्णय चुकीचा असून, यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे. कायदा करताना व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. राज्यातील शेतकरी दुष्काळ तसेच गारपिटीने ग्रस्त असताना त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधले जावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगून या निर्णयाचा सर्वानुमते निषेध व्यक्तकरण्यात आला. सूत्रसंचालन व प्रास्ताविक बाळासाहेब कर्डक यांनी केले. (वार्ताहर)