नाशिक : महाराष्ट्र शासन लिखित निळ्या रंगाचे जुने हेलिकॉप्टर (डॉफिन एएस-३६५ एन-३ व्ही टी एमजीके) मुंबईहून एका कंटेनरवरून शहरात आणले गेले. राज्य शासनाकडून जुने झालेले हे हेलिकॉप्टर भोसला सैनिकी शाळेला देणगी स्वरूपात दिले गेले. सैनिकी शाळा असल्यामुळे येथे प्रदर्शित करण्यासाठी हेलिकॉप्टर देण्यात आल्याची माहिती सर कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर यांनी दिली.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन संस्थेच्या भोसला सैनिकी शाळेला राज्य शासनाकडून जुने हेलिकॉप्टर आवारात प्रदर्शित करण्यासाठी दिले गेले. रविवारी (दि.१६) दुपारी हेलिकॉप्टर शाळेच्या आवारात एका कंटेनरवरून दाखल झाले. पोलीस आयुक्तालय हद्दीत विल्होळी येथे कंटेनर पोहोचताच तेथून पुढे थेट भोसला सैनिकी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून बंदोबस्त देण्यात आला होता. हेलिकॉप्टरचे पंखे काढून घेण्यात आले असून, निळ्या रंगाचे हेलिकॉप्टर भोसला सैनिकी शाळेत रविवारी पोहोचले. विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे या शाळेतून दिले जातात. त्यासाठी हेलिकॉप्टरचे ‘डेमो’ स्वरूपात प्रारंगणात असावा, याकरिता भोसलाचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी शासनाकडे याबाबत मागणी केली होती.विमान संचलनालय जुहू विमानतळ येथून या हेलिकॉप्टरची वाहतूक मुंबई ते नाशिक एका कंटेनरवरून करण्यात आली. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करताना हे निळे हेलिकॉप्टर अनेकांच्या कुतुहलाचा विषय ठरला. हेलिकॉप्टर जेव्हा विल्होळी येथून शहराच्या हद्दीत आले तेव्हा प्रत्येक चौकामध्ये नागरिकांकडून या कंटेनरवर स्वार हेलिकॉप्टरचे मोबाइलमधून छायाचित्र काढले जात होते. हेलिकॉप्टरला महात्मानगर रस्त्यावर झाडांचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून लोंबकळणाऱ्या फांद्यांचीही छाटणी करण्यात आली. कुठल्याही प्रकारे रहदारीला अडथळा निर्माण होऊन वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, म्हणून हेलिकॉप्टरची वाहतूक करणा-या कंटेनरला शहर वाहतूक शाखेकडून कर्मचाऱ्यांचा विशेष बंदोबस्त देण्यात आला होता.विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहणारउन्हाळी सुटीनंतर सोमवार (दि.१७) पासून शाळा सुरू होणार असून, यानिमित्ताने विद्यार्थी तब्बल महिनाभरानंतर शाळेच्या आवारात प्रवेश करणार आहेत. भोसला सैनिकी शाळेच्या आवारात काही तरी नवीन बदल विद्यार्थ्यांना सोमवारी नजरेस पडण्याची शक्यता आहे. तसे जुने मात्र शालेय मुलांसाठी नवीन असलेल्या या हेलिकॉप्टरसोबत सेल्फी काढण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहू शकतो.