नाशिक : प्राथमिक सोयी-सुविधांच्या विकासकामांसाठी राज्य शासनाकडून महापालिकेला देण्यात येणाऱ्या विशेष अनुदानांतर्गत प्रस्तावांना विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यात प्रामुख्याने नाशिकरोडच्या नाट्यगृहासह शिखरेवाडी येथे क्रीडांगण, दसक येथे स्केटिंग ग्राउंड व जॉगिंग ट्रॅक या कामांचा समावेश असून, सुमारे २० कोटी रुपये खर्चाच्या या कामांसाठी पहिल्या टप्प्यात तीन कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. राज्य शासनामार्फत सार्वजनिक स्वरूपाच्या विकासकामांसाठी महापालिकेला विशेष अनुदान दिले जाते. त्यात महापालिका व शासन यांचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा असतो. महापालिकेने सदर कामांमध्ये नाशिकरोड येथे देवळाली शिवारात स. नं. ११७ (पै) मध्ये १७ कोटी ९८ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर केला होता. याशिवाय, नाशिकरोड विभागातच प्रभाग क्रमांक ५६ मध्ये शिखरेवाडी येथे स.नं. ११२ मध्ये क्रीडांगण विकसित करण्यासाठी एक कोटी ९९ लाख रुपये, तर नाशिकरोड विभागातीलच प्रभाग क्रमांक ३२ मधील स.नं. ६८ (पै) येथे दसकमध्ये स्केटिंग ग्राउंड व कम्पाउंड तसेच दसक येथे जॉगिंग ट्रॅक उभारणीचा प्रस्तावांचाही समावेश होता. बैठकीला मनपाचे आयुक्त अभिषेक कृष्ण, अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, शहर अभियंता सुनील खुने आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)आणखी अनुदानाची मागणीशासनाने नाट्यगृह उभारणीसाठी पाच कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिलेली आहे, परंतु सदरचे काम पाच कोटी रकमेत होणे शक्य नसल्याने महापालिकेने आणखी ६.५० कोटीचे अनुदान प्राप्त होण्यासाठी मागणी केली होती. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन सदर प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नाट्यगृहासाठी २.५० कोटी, क्रीडांगणासाठी एक कोटी, तर दसक येथे स्केटिंग ग्राउंड व जॉगिंग ट्रॅकसाठी ३५ लाख याप्रमाणे एकूण तीन कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले.
नाशिकरोड नाट्यगृहाला शासनाचे अनुदान मंजूर
By admin | Published: October 30, 2016 12:43 AM