अझहर शेख ल्ल नाशिकआदिवासींचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात; मात्र सरकारी योजनांचा लाभ आदिवासींपर्यंत पोहचत नाही. परिणामी आजही देशात केवळ नऊ टक्के क्षेत्रावर वास्तव्यास असलेल्या आदिवासी समाजाला मागासलेपणाचा सामना करावा लागत आहे, असे मत हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक व ‘मॅगेसेसे’ पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.नाशिकच्या भेटीवर आलेले आमटे व त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी उपनगर येथील फुलसुंदर इस्टेट परिसरात पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांनी पालिकेच्या खुल्या जागेत विकसित केलेल्या दुर्मीळ देशी वृक्षांच्या उद्यानाला भेट दिली. यावेळी आमटे म्हणाले, निसर्गाच्या सान्निध्यात जंगलात राहणारे आदिवासी नागरिक हेदेखील मनुष्यच आहेत; मात्र त्यांचा फारसा संबंध जगाशी येत नसल्यामुळे ते इतरांपेक्षा समाजाला वेगळे वाटतात. हे समाजाचे म्हणण्यापेक्षा आदिवासींचेच दुर्दैव म्हणावे लागेल. ते जगत असलेले जीवन बाबांनी बघितले व त्यांनी आदिवासींच्या विकासासाठी स्वत:चे उभे आयुष्य झोकून दिले. त्यांचे संस्कार व कार्यातून प्रेरणा घेत मी व मंदा त्यांचाच वारसा जोपासण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असल्याचे आमटे यांनी सांगितले. आदिवासीदेखील या देशाचा नागरिक असून, त्यालादेखील इतर मनुष्याप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे; मात्र त्याचा संपर्क जंगलाबाहेरच्या जगाशी येत नसल्याने ते इतरांपेक्षा वेगळे जीवन जगत आहेत. राग येणे हा सजीवाचा गुणधर्मच आहे. असाच राग हा आदिवासींनादेखील येतो व ते रागाच्या भरात येऊन काही तरी वेगळे करण्याचे धाडस दाखवतात आणि त्यांच्या हातून गुन्हा घडतो; मात्र त्या आदिवासींना त्याची कल्पना नसते. सरकारी यंत्रणेची धुरा सांभाळणाऱ्या ‘सुज्ञ’ नोकरदारवर्गाने जर त्यांना समजून घेतले तर कदाचित परिस्थिती बदललेली पाहावयास मिळेल. नोकरदारवर्गाच्या नकारात्मक दृष्टिकोनातून वागण्यामुळे सरकारी यंत्रणेवर त्यांचा रोष आहे. सरकारी नोकरदारांनी आदिवासींना समजून घेत त्यांच्याविषयी सकारात्मक राहून आपले कर्तव्य पार पाडल्यास आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास वेळ लागणार नाही, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आदिवासींबाबत सरकारी यंत्रणेचाही सकारात्मक दृष्टिकोन हवा
By admin | Published: January 28, 2015 11:39 PM