नाशिक (सुयोग जोशी) : नांदेड आणि कळव्यात सरकारी रूग्णालयात झालेले मृत्यू म्हणजे मानवी चूक आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ढासळत चालली आहे. सरकारने वर्षभरापासून कोणतीही औषध खरेदी केली नाही की टेंडर काढले नाही. सरकारला फक्त ज्यात स्वारस्य आहे, त्याच बाबींची खरेदी केली जात असल्याचे सांगत ‘शासन आपल्या दारी नव्हे, मृत्यू आपल्या घरोघरी’ असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना केला.
राज्यात नांदेड शासकीय रुग्णालयात दोन दिवसांत ३१ रूग्णांचा मृत्यू , पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात अजून काही मृत्यू झाले. काही महिन्यांपूर्वी कळव्याला असे तांडव झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी शासनाच्या संदर्भ रूग्णालयात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी विविध विभागांना भेट देत माहिती घेतली. शिवाय जेथे जेथे मशिनरीची कमतरता आहे, त्या लवकरात लवकर घेण्यात याव्यात. याबाबत सरकारला माहिती देण्यात यावी. मशिन खरेदीसाठी सरकारकडे आग्रह धरण्यात येत त्याबाबत संदर्भ रूग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे दानवे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते बबनराव घोेलप, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, सुनील बागुल आदी उपस्थित होते.