नाशिक : दक्षिण गंगा गोदावरीचे पावित्र्य नष्ट होत चालले आहे. कचरा आणि मलजल घेत गोदामाई प्रवाहित होत असताना तिच्या या प्रदूषणकारी रूपाविषयी श्रद्धाळू व्यथित होत असून सरकारी यंत्रणा मात्र मूकपणे बघत आहेत. गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी लढणारे आणि काही तरी केल्याचे आव आणणारे सारेच कुठे गेले, हे मात्र दिसत नाही. विशेषत: गोदावरी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी संपल्याने सारी यंत्रणाच सुस्तावलेली असून, गोदावरीवरील हिरवा थर असो की तपोवनात निर्माण होणारा फेस असो, त्याची दखल घेण्यास कोणीही तयार नाही.गोदावरी नदीचे वर्षानुवर्षे प्रदूषण वाढत आहे. धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या गोदावरीचे होत असलेले प्रदूषणकारी रूप खूपच विदारक होत आहे. गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा गेल्या काही वर्षांत पर्यावरणप्रेमींच्या आक्रमकतेने हा प्रश्न लक्षवेधी ठरला आणि न्यायालयात तो मांडला गेल्यानंतर न्यायालयाने काही सूचना केल्या त्यानुरूप काही उपाययोजना झाल्या. परंतु गोदावरी शंभर टक्के गोदा प्रदूषणमुक्त झालीच नाही किंबहुना जोपर्यंत न्यायालयात हे प्रकरण प्रविष्ट होते तोपर्यंत महापालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, जलसंपदा विभाग तसेच पोलीस यंत्रणा, औद्योगिक विकास महामंडळ आणि राज्य शासन सारेच सजग होते. परंतु आता या खटल्याच्या निकालाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे यंत्रणा पुन्हा ढसाळ झाल्या आहेत.गेल्या काही महिन्यांपासून गोदावरी नदीवर हिरवा थर जमा झाला आहे. कुंभमेळ्यातील प्लॅस्टिक बंदी कागदावरच राहिली आहे. गोदाकाठी सर्व प्रकारची घाण-कचरा साचला आहे. निर्माल्य कलश भरून वाहत आहेत, परंतु ते उचलण्याची तसदी कोणी घेत नाही. नदीपात्रात कचरा टाकणाºयांवर गुन्हे दाखल करणारे पोलीस केव्हाच गायब झाले आहेत, तर सिक्युरिटी नावालाच आहेत. त्यामुळे आता गोदावरी विषयीची कळकळ आणि संवेदना संपली काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गोदावरीने का पांघरली हिरवी शाल?गोदापात्रावर सध्या हिरव्या वनस्पती उगवल्या असून, त्यामुळेच प्रदूषण पुन्हा एकदा अधोरेखित होऊ लागले आहे. सध्या गोदावरी नदीचे पाणी प्रवाहित नाही. ते साचलेले किंवा तुंबलेले आहे. त्यातच प्रदूषणकारी घटकांची सतत भर पडत असल्याने अशाप्रकारच्या वनस्पती उगवल्या आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले. तथापि, यावर उपाय म्हणून महापालिका, जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकारी यांनी एकत्रितरीत्या पाणी प्रवाही करण्याचा प्रयत्न करावा, शक्य असल्यास पाणी सोडावे, अशी सूचनादेखील अभ्यासकांनी केली आहे.
शासकीय यंत्रणा सुस्तावली : कारवाई करणारे गेले कुठे, याचा सर्वांना प्रश्न पुन्हा प्रदूषित गोदामाई, तरी कुणा पर्वा नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:07 AM
दक्षिण गंगा गोदावरीचे पावित्र्य नष्ट होत चालले आहे. कचरा आणि मलजल घेत गोदामाई प्रवाहित होत असताना तिच्या या प्रदूषणकारी रूपाविषयी श्रद्धाळू व्यथित होत असून सरकारी यंत्रणा मात्र मूकपणे बघत आहेत.
ठळक मुद्देसारी यंत्रणाच सुस्तावलेली प्रदूषणकारी रूप खूपच विदारक यंत्रणा पुन्हा ढसाळ झाल्या