नाशिक : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत गंभीर नाही. त्यामुळे शेतकरी हिंसक झाले तर त्यास सरकारच जबाबदार, असे स्पष्ट मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. हे आंदोलन हिंसक व्हावे, ही केंद्र शासनाची अपेक्षा आहे काय, असा प्रश्न त्यांनी केला.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी नाशिकरोड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत नाही. केंद्रात बहुमत आहे, म्हणून अहंकार योग्य नाही, असा अहंकार जनतेपुढे चालत नाही असे सांगून राऊत म्हणाले, शेतकरी आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे अराजकता माजू शकते आणि शेतकरी हिंसक झाल्यास सरकारच जबाबदार राहील, असे शरद पवार देखील म्हटले आहेत, त्याचे स्मरणही राऊत यांनी सांगितले. मुळात हे आंदोलन राजकीय पक्षांचे नसून किसान संघटनांचे आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे, असेही खासदार राऊत म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या राजकीय वादाविषयी बोलताना राऊत यांनी विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असावे हे अगोदरच ठरले आहे, असेही सांगताना त्यांनी सत्ताबदलासाठी फासे टाकणाऱ्या विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. पाच वर्षे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले, त्यांनी आता पेट्रोलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोलाही राऊत यांनी लावला. एल्गार परिषदेसंदर्भात बोलताना त्यांनी त्यांची मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे, त्यांच्यामुळे राज्यात वातावरण खराब होत असेल तर यापुढे परवानगी देण्याबद्दल विचार करावा लागेल, असेही राऊत म्हणाले.
इन्फो...
राज्यपालांनी न्यायालयात जाण्यास भाग पाडू नये
राज्यपाल नियुक्त बारा आमदारांबाबत अद्याप निर्णय होत नाही. मुळात सरकारने केलेल्या शिफारसी राज्यपालांना स्वीकारणे बंधनकारक आहे. त्यामुळे आमदार नियुक्तीसाठी न्यायालयात जाण्यास भाग पाडू नये, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.