नाशिक : नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करून नागपूरला स्वतंत्र आयुष विद्यापीठ स्थापन करण्याबाबत सरकारने अनभिज्ञता दर्शवित घूमजाव केले असून, अशा प्रकारे कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करून आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी फॅकल्टीसाठी नागपूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या हालचाली झाल्याने नाशिकमध्ये याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नाशिककरांसह विद्यापीठ कर्मचारी आणि स्थानिक आमदारांनी कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठाचे विद्यापीठ दुबळे होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार देवयानी फरांदे यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारचा असा कोणताही प्रस्ताव अथवा सूचना नसल्याची भूमिका घेत हा मुद्दा नेमका कधी उपस्थित झाला हे पहावे लागेल, असे सांगितले. (पान ७ वर)वैद्यकीय शिक्षण विभागाने आयुष संचालनालयाला आदेशित केल्यानुसार संचालनालयाने गठीत केलेली समिती, जागेचा शोध घेण्यासाठी समितीला ३१ जानेवारी अखेरची दिलेली मुदत आणि समितीने लागलीच सुचविलेली ७० एकर जागा या सर्व हालचाली अवघ्या महिनाभराच्या आत घडल्याची बाब फरांदे यानी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत अनभिज्ञता दर्शवित फडणवीस यांनी विद्यापीठाच्या विभाजनाचा मुद्दा आपल्या कार्यकाळातील नसून आरोग्य विद्यापीठाचे कोणत्याही प्रकारे विभाजन होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आरोग्य विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाल्यानंतर सुरूवातीपासून हे विद्यापीठ नाशिकला होऊ नये यासाठी अनेक ठिकाणहून राजकीय स्तरावर प्रयत्न झाले होते. मात्र, (कै.) दौलतराव अहेर युती सरकारात मंत्री असताना हे विद्यापीठ नाशिकला स्थापन करण्यात आले. सत्ताबदलानंतर मात्र या विद्यापीठाकडून सीईटी काढून घेण्याबरोबर अनेक प्रकारे अडचणीत आणले होते. आता थेट विद्यापीठाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव आला असून त्यानिमित्ताने नाशिकचे विद्यापीठ दुबळे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नाशिकमध्ये होत आहे.
विभाजन प्रकरणी सरकार अनभिज्ञ
By admin | Published: February 01, 2016 11:59 PM