नाशिक : विधान परिषद निवडणुकीतील शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील मतदार शिक्षित असल्याने त्यांना सरकारच्या धोरणांच्या परिणामांचे चांगले-वाईट परिणाम कळू शकतात. त्यामुळे नाशिक विभागातील निवडणूक सत्ताबदलाची नव्हे, तर केंद्र व राज्य सरकारच्या ध्येय्य-धोरणांचा जय-पराजय ठरविणारी निवडणूक असल्याचे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले. गोळे कॉलनीतील गद्रे मंगल कार्यालयात नाशिक पदवीधर मतदारसंघातील डाव्या आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे, प्रा. के. एस. अहिरे, राजू देसले, डॉ. दत्ता निकम आदि उपस्थित होते. कानगो यांनी केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यावर कराच्या माध्यमातून कर्ज उभारणाऱ्या असल्याचा आरोप केला. सरकार विकासाचे भ्रामक चित्र निर्माण करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे सांगत सरकारच्या धोरणांवर टीकेची झोड उठवली. राज्यात बुलेट ट्रेन, मेट्रो, स्मार्ट सिटी, समृद्धी मार्ग प्रकल्पांच्या माध्यमातून विकास होत असल्याचे सांगितले जाते. परंतु नागपूर-मुंबई असे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग असे दोन मार्ग असताना केवळ शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्यासाठी ५० हजार कोटी खर्चून समृद्धी महामार्गाचा घाट घालणे व नागपूरसारख्या शहरात मेट्रोसाठी १२ हजार कोटींचा खर्च कराच्या स्वरूपात सर्वसामान्य नागरिकांनाच भरावा लागणार आहे. देशात सर्वाधिक वाहतूक मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावर असताना ७० हजार कोटी खर्चून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा घाट कशासाठी, असा सवालही कानगो यांनी उपस्थित केला. सरकारच्या या भ्रामक धोरणांनी शिक्षित मतदारांनी ओळखले असून, या विधान परिषद निवडणुकांमध्ये हा सुशिक्षित मतदार सरकारच्या धोरणाचे यशापयश ठरविणार असल्याचे मत कानगो यांनी व्यक्त केले. दरम्यान प्रतिभा शिंदे यांनीही काँग्रेस आणि भाजपाला टीकेचे लक्ष्य केले. (प्रतिनिधी)
पदवीधरमध्ये ठरणार सरकारचे भवितव्य
By admin | Published: January 23, 2017 12:39 AM