कसबे-सुकेणे: - चांगली गुणवत्ता असणारे कांदा व लसुण यांचे बीज राष्ट्रीय बागवानी प्रतिष्ठानने विकसित केले असून यात कांद्याचे सोळा तर लसणाचे सोळा वाण आहेत. यातील १० कांदा वाण व लसणाच्या ६ वाणाला भारत सरकारने मान्यता दिली आहे ,असे प्रतिपादन एनएचआरडीएफचे संचालक डॉ पी. के. गुप्ता यांनी केले. निफाड तालुक्यातील चितेगाव येथील कांदा,लसूण आणि बटाटा उत्पादक शेतकºयांसाठी दोन दिवसीय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.गुप्ता यांनी ही माहिती दिली . एच आर डी एफ अर्थात राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठान या संस्थेला ४० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी द्राक्ष निर्यायदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे होते. व्यासपीठावर नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, संजय होळकर, यू. बी. पांडे., डॉ.एस. आर. भोंडे उपस्थित होते. यावेळी गुप्ता पुढे म्हणाले की, या शिबिराचा शेतकºयांनी फायदा करून घ्यावा आणि कांदा,लसूण व बटाटा या पिकांचे उत्पादन दुपटीने कसे वाढेल असा प्रयत्न करावा राजस्थानात पाण्याची कमतरता असल्याने कांद्याची गुणवत्ता मिळत नाही. त्यामुळे तिथे लाल कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकºयांना अशाच प्रकारचे शिबीर घेतले जाणार असल्याचे सांगितले आणि एखाद्या पिकाला भाव मिळाल्यावर सर्वच शेतकरी तेच पीक घेतात असे न करता वेगवेगळी पिके घ्यावीत असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील म्हणाले की, गेल्या २२ महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात कांदा विकत आहे . आता जो भाव कांद्याला मिळतोय तो परतीच्या पावसात इतर ठिकाणचा कांदा खराब झाल्याने माल शिल्लक नसल्याने भेटतो आहे असे स्पस्ट केले. यावेळी यु बी पांडे म्हणाले की, कांद्याचे भाव पडले त्यावर उपाययोजना करताना त्यावेळी ही संस्था स्थापन करण्यात आली. यापुढे लाल कांदाही साठवता येईल अशा प्रकारचे वाण विकसित केले आहे. उत्तर भारतात लाल कांद्याला चांगली पसंती आहे, राजस्थानमध्ये १८ हजार क्षेत्रावर कांदा पीक घेतले जाते असे ते म्हणाले. अध्यक्षीय मनोगतात जगन्नाथ खापरे यांनी रासायनिक खतामुळे जमीन खराब झाली असून सेंद्रिय खते वापरून शेती करावी असे आवाहन केले . या शिबिराला महाराष्ट्रासह राजस्थानातून आलेल्या २०० पेक्षा अधिक शेतकºयांनी सहभाग घेतला . चितेगाव केंद्राचे आर के सिंग यांनी सूत्रसंचालन केले तर शिल्पा फासे यांनी आभार मानले.
कांदा, लसणाच्या नवीन वाणाला सरकारची मान्यता- पी.के. गुप्ता : चितेगाव राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्रात मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:25 PM