नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक मुंबईतील निवसास्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्लामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीसह भाजप नेत्यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी आरोप-प्रत्यारोपही झाले. यातच आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी या घटनेवर भाष्य करत अशी घटना पुन्हा घडायला नको, असे म्हटले आहे.
नाशिकमध्ये भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सिल्व्हर ओक हल्ल्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी जो हल्ला केला, त्या घटनेवर स्वत: मुख्यमंत्री लक्ष देत आहे. तसेच शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला ते तसा हल्ला भविष्यात होणार नाही, याची खबरदारी सरकारकडून घेण्यात यावी.
अशी घटना परत व्हायला नको
शरद पवार यांच्या मुंबईस्थित निवासस्थानी सिल्वर ओक येथे एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला चढवला. याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले मत व्यक्त केले. मुख्यमंत्री हे प्रकरण हाताळत आहे आणि स्वतः शरद पवार हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. ही घटना परत व्हायला नको, याची काळजी घ्यायला हवी. यावर राज्य सरकार पुढे लक्ष देईल, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या हल्ल्यानंतर सर्व सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून, या प्रकरणी आता शोध घेतला जात आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.