नाशिक : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शनिवारी (दि.९) नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त पालकमंत्री छगन भुजबळ व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेही नाशकात दाखल होणार आहेत. राज्यपाल कोश्यारी हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या नाशिक शाखेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमास उपस्थित राहणार असून, सकाळी दहा वाजता कालिदास कलामंदिर येथे होणाऱ्या एक दिवशीय उत्तर महाराष्ट्र विकास परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या कार्यक्रमानंतर सायंकाळी पाच वाजता एस.एस.के. वर्ल्ड येथे होणाऱ्या अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर, राज्यपाल सिन्नरच्या गारगोटी संग्रहालयाला भेट देणार असून, नंतर सोयीने मुंबईकडे प्रयाण करतील. राज्यपाल यांच्या दौऱ्यानिमित्त राजशिष्टाचाराचा भाग म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेही नाशकात दाखल होत आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होऊन या बैठकीत दौऱ्याची रंगीत तालीम करण्यात आली, तसेच प्रत्येकाला जबाबदारीचे वाटप करण्यात आले.
चौकट===
जुगलबंदीकडे साऱ्यांचे लक्ष
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या यापूर्वीच्या दोन दौऱ्यांत राजकीय जुगलबंदी चांगलीच चर्चेत आली होती. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बारा आमदारांच्या नियुक्तीच्या प्रश्नावर राज्यपालांकडून होत असलेल्या चालढकलीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल नाशकात येत असल्याने व त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी व काँग्रेसचे मंत्रीही कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने, राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.