कळवण : कळवण तालुक्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यास मंजुरी द्यावी, असे निर्देश राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण सचिवांना दिले आहेत.नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील तांत्रिक अनुशेष अजूनही भरून निघालेला नसल्याने तो भरून काढण्यासाठी राज्य सरकारने कळवण येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे केली होती. कळवण, सुरगाणा, बागलाण, देवळा, पेठ, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्याचा तांत्रिक अनुशेष बाकी असून, अजूनही भरलेला नाही. कळवण येथे एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहे. आदिवासी बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जातात. तालुक्यात प्राथमिक व माध्यमिक सुविधा असल्याने सदर शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतांशी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना व्यावसायिक शिक्षणासाठी मुंबई, पुणे आणि नाशिक तसेच इतर शहरात जावे लागते हे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यानुसार राज्यपालांनी यात लक्ष घालून राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण सचिवांना वरील निर्देश दिले आहेत. (वार्ताहर)
अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी राज्यपालांचे निर्देश
By admin | Published: February 11, 2016 12:19 AM