सिन्नर : येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना नगरसेवक गोविंद लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपरिषदेत शिवसेनेचे बहुमत असून अपेक्षेनुसार लोखंडे यांची बिनविरोध निवड पार पडली.उपनगराध्यक्ष शैलेश नाईक यांनी सहकारी नगरसेवकांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळावी यासाठी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती. शुक्रवारी नगराध्यक्ष तथा पीठासन अधिकारी किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली.शुक्रवारी सकाळी मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्याकडे गोविंद लोखंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. लोखंडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे तर अनुमोदक म्हणून नगरसेवक बाळासाहेब उगले यांनी स्वाक्षरी केली होती. निर्धारित वेळेत लोखंडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने पीठासन अधिकारी डगळे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. भाजपा गटनेते नामदेव लोंढे यांनी निवडीचे स्वागत केले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डगळे यांच्याहस्ते नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, उपनगराध्यक्ष निवडीनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या हस्ते लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला.
सिन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी गोविंद लोखंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 6:19 PM
शिवसेनेचे बहुमत : अपेक्षेनुसार लोखंडे यांची बिनविरोध निवड
ठळक मुद्देभाजपा गटनेते नामदेव लोंढे यांनी निवडीचे स्वागत केले.