नाशिक : कामगारांचे नेते व पुरोगामी विचारधारा राज्यभरात रुजवित डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा वारसा जोपासणारे कॉम्रेड डॉ. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद सोमवारी (दि.१६) सकाळी शहरात उमटले. सर्व डावे पक्ष, आयटक, अंनिस यांसारख्या संघटनांंसह पुरोगामी चळवळीच्या संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शहरातून मोर्चा काढला. राज्य व केंद्र सरकारसह पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, दादासाहेब पोतनीस चौकात दुपारच्या सुमारास ठिय्या मांडून रास्ता रोको केला. यामुळे वीस ते पंचवीस मिनिटे वाहतूक खोळंबा झाला.भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, आयटक-इंटक, छात्रभारती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदि पुरोगामी संघटनांनी एकत्र येत हुतात्मा स्मारकात पानसरे दाम्पत्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. दाभोलकरांप्रमाणे पानसरे दाम्पत्यावर झालेला हा हल्ला पुरोगामी विचारांच्या चळवळीचे ऊर्जा केंद्र संपविण्याचा डाव असल्याचे मत कॉमे्रड राजू देसले, श्रीधर देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केले. पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना पोलीस प्रशासनाने तातडीने अटक करावी व या घटनेचा तपास नि:पक्षपातीपणे करावा व दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हुतात्मा स्मारकापासून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी सत्ताधारी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला. मोर्चा सीबीएस, शालिमार, नेहरू उद्यानामार्गे एम.जी. रोडने मेहेर चौकात पावणे बारा वाजता पोहचला.
गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद
By admin | Published: February 17, 2015 1:11 AM