नाशिक : रामभक्त हनुमानाचे जन्मस्थळ नाशिकमधील अंजनेरी नसून कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा करणारे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी दुसऱ्या दिवशीही आक्रमक भूमिका घेत किष्किंधा मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. अंजनेरीसंदर्भात सादर करण्यात आलेले पुरावे पुरेसे नसल्याचा दावा करीत त्यांना नाशिकमधील साधू महंतांना पुन्हा एकदा आव्हान दिले. दरम्यान, बुधवारी (दि. १) नाशिक सोडताना त्यांनी नाशिककरांना किष्किंधाला दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्या गोविंदानंद सरस्वती यांनी मंगळवारी नाशिकमधील धर्मसभेनंतर रात्री उशिरा पुन्हा नाशिकचे साधू, महंत, अभ्यासक यांना आव्हान देत माध्यमांसमेार उत्तर परिषद घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी (दि.१) त्यांनी किष्किंधा मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी उत्तर कन्नड येथील गोकर्ण आणि आंध्रमधील तिरुमाला येथील हनुमान जन्मस्थळाचा मुद्दा मिटला असून, आता केवळ नाशिकच्या अंजनेरी येथील जन्मस्थळाचा मुद्दा असून, हा वाददेखील आपण धर्मशास्त्राच्या आधारावर सिद्ध करून दाखवू, असा पुनरुच्चार गोविंदानंद सरस्वती यांनी केला आहे.
नाशिकमधील साधू महंतांना अंजनेरीसंदर्भातील मांडलेले मुद्दे पुरेसे नाहीत. याशिवाय सरकारी गॅझेट हा पुरावा होऊ शकत नसल्याने वाल्मीकी रामायणमध्ये मांडलेले सर्व तथ्ये कर्नाटकातील किष्किंधा येथेच असल्याचे आपण सिद्ध केल्यामुळे अंजनेरी हनुमानाचे जन्मस्थळ नसल्याच्या मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.