सिडको : गेल्यावर्षी सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या गोविंदनगर भागात यंदाही मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या दहा दिवसात गोविंदनगर भागात सुमारे २५ हून अधिक रुग्ण आढळल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या या परिसराला महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. येथील प्रमुख मार्गावर बॅरिकेट करण्यात आले आहे.
शहरालगत असलेल्या गोविंदनगर या उच्चभ्रू परिसरात मागील वर्षी याच भागातून पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यावेळी सुमारे एक किलोमीटर परिसराचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता. यंदाच्या वर्षीही गोविंदनगर भागात असलेल्या काही इमारतींमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या दहा दिवसातच या भागातील सुमारे सहा इमारतींमधील २५ हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, एकाच भागात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याने या परिसराला मनपाच्या वतीने बॅरेकेटिंग करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागातील ज्या इमारतींमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशा इमारतीला प्रतिबंधित क्षेत्र असे फलक लावण्यात आले आहेत. इमारतीत बाहेरील व्यक्तिंना प्रवेश बंद करण्यात आला आहे. इमारतीमध्ये ज्या व्यक्तिंना अत्यावश्यक काम असेल अशांना घराबाहेर जाण्यासाठी व येण्यासाठी सांगण्यात आले असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले. गोविंदनगर भागात पॉझिटिव्ह रुग्ण झपाट्याने आढळत असल्याने मनपाच्या वतीने नागरिकांच्या घरोघरी जाऊन कोरोना टेस्ट करण्यात आली. सुमारे दोनशेहून अधिक नागरिक व दुकानात कामकाज करणाऱ्या नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या. यापुढील काळातही ही मोहीम अशीच सुरु राहणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.