नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भरविण्यात आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत पेठ तालुक्यातील शाळांना सर्वाधिक गुण मिळालेले असतानाही डावलण्यात आले असून, वशिलेबाजीने दिंडोरी तालुक्याला सर्वसाधारण जेतेपद देण्यात आल्याचा आरोप पेठ तालुक्यातील शिक्षक समन्वय समितीने केला आहे.या संदर्भात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके यांना निवेदन देण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या शिवाजी स्टेडियम येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा समारोप करण्यात येऊन अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते दिंडोरी तालुक्याला सर्वसाधारण जेतेपद देण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर पेठ तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येत दिंडोरीला जेतेपद देण्यास आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पेठ तालुक्याला सर्व स्पर्धांमध्ये ७४ गुण मिळालेले आहेत, तर दिंडोरी तालुक्याला फक्त ७० गुण होते. असे असताना ऐनवेळी कोणतीही पूर्वसूचना न देता नवोपक्रम व रांगोळी स्पर्धा भरविण्यात आल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा फक्त विद्यार्थ्यांसाठी असून, त्यात शिक्षकांचा समावेश नाही. असे असताना दिंडोरी तालुक्याला डोळ्यासमोर ठेवून मुद्दाम नवोपक्रम व रांगोळी स्पर्धा घेण्यात येऊन त्यात शिक्षकांचा सहभाग घेण्यात आला. सदरची बाब पेठ तालुक्याला डावलण्यासाठीच केली गेली असून, पेठ गटाला सर्वाधिक गुण मिळूनही शिक्षण विभागाने दिंडोरी गटाला सर्वसाधारण जेतेपद जाहीर केले आहे.या कृत्यामुळे पेठ तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मानसिकेतवर परिणाम होऊन त्यांचे मनोर्धेर्य खच्चीकरण झाले असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दरवर्षीप्रमाणे केवळ मुलांच्या कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे मूल्यमापन करून पेठ तालुक्याला सर्वसाधारण विजेते घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर पेठ तालुक्यातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा ही विद्यार्थी व शिक्षकांच्या एकूणच परफॉर्मन्ससाठी आयोजित केली जाते. पेठ गटाला सर्वाधिक गुण मिळाले असले तरी, स्पर्धेत समाविष्ट करण्यात आलेले नवोपक्रम व रांगोळी स्पर्धेत पेठ तालुक्याच्या शिक्षकांनीही सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मात्र ते चांगले गुणांकन मिळवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा गुणांकन खालावल्यामुळे दिंडोरी तालुक्याला सर्वसाधारण जेतेपद देण्यात आले.- डॉ. वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी