नाशिक : गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होेते. या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व सोपस्कर पूर्ण करण्यात येऊनही दिवाळीनंतर केवळ दीड लाख शेतकऱ्यांनाच मदत मिळू शकली. त्यामुळे दोन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा असताना तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर उर्वरित शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला.
राज्याला बसलेला अतिवृष्टीचा फटका त्यातच कोरेानाचे संकट यामुळे मदतीला विलंब होणार असला तरी शासनाकडून यासाठी निधीचीदेखील तरतूद करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होण्यास अपेक्षेपेक्षा अधिक विलंब झाला. दिवाळी तोंडावर आल्याने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र शेतकऱ्यांना दिवाळीतही गोड बातमी मिळाली नाही. दिवाळीनंतर का होईना जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार शेतकऱ्यांसाठी ११० कोटी प्राप्त झाले. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमाही करण्यात आली. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३ लाख ६६ हजार ८३० शेतकऱ्यांचे नूकसान झाले असताना केवळ निम्म्याच शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हफ्ता मिळाल्याने उर्वरित २ लाख ४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी रक्कम जमा होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. अखेर चार महिन्यांनंतर का होईना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १११ कोटींचा दुसरा हप्ता देण्यात आला. चार महिन्यांनंतर उर्वरित शेतकऱ्यांवर कृपादृष्टी बरसल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. सोयाबीन, कांदा, मका तसेच ज्वारीच्या पिकांना मोठा फटका बसला. शेतातील उभे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला. शेतमालाबरोबरच भाजीबाला पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे पूर्ण करण्यात आले, परंतु कोरोनामुळे राज्यातील आर्थिक स्थिती डगमगल्यामुळे मदत नेमकी कधी मिळेल याविषयीची शंका उपस्थित झाली होती. मदतीची मागणी होऊ लागल्याने शासनाने दिवाळीत शेतरकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल, असे जाहीर केले होते. परंतु दिवाळीदेखील टळून गेल्याने चिंता वाढली होती.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३ लाख ६६ हजार ८३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी २४२ कोटींची मदत शासनाकडे मागितली होती. दिवाळीनंतर त्यापैकी ११० कोटींची मदत देण्यात आली. त्याचा लाभ एक लाख ६२ हजार शेतकऱ्यांना झाला. उर्वरित शेतकऱ्यांनादेखील डिसेंबरच्या आत मदत दिली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र डिसेंबर उलटून गेल्यानंतरही मदतीची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे चिंता वाढली होती. अखेर जानेवारीच्या उत्तरार्धात शासनाची कृपादृष्टी बरसली आणि अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.