नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला पाच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला असून, प्रमुख तिन्ही उमेदवारांनी विभागात प्रचाराच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. या निवडणुकीत जाहीर प्रचार नसल्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यापेक्षा उमेदवारांच्या गाठीभेटीवर भर दिला जात आहे. पदवीधर मतदारसंघासाठी येत्या ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याने त्याची प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून, राजकीय पक्ष व उमेदवारांनीही या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे. डॉ. सुधीर तांबे यांनाच पुन्हा कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याचे जवळजवळ वर्षभरापूर्वीच स्पष्ट झालेले असल्यामुळे तांबे यांनी त्या दृष्टीने तयारी करून ठेवली होती, त्यामुळे मतदार नोंदणीतही त्यांनी आघाडी घेतलेली आहे. याशिवाय आमदार असताना मतदारसंघातील शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, संस्थांशी त्यांचा निकटचा परिचय आलेला असल्यामुळे त्यांचा दौरा जवळजवळ पूर्ण झालेला आहे. शनिवारी डॉ. तांबे यांनी कसमा पट्ट्यात जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या, तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तांबे यांच्या प्रचारार्थ सटाणा येथे कार्यकर्ता मेळावा घेऊन मार्गदर्शन केले. भाजपाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांनीही मतदार संघ पिंजून काढला असून, भाजपाचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी डॉ. पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना लावलेली हजेरी पाटील यांच्या पथ्थ्यावर पडली असून, शैक्षणिक क्षेत्रातील मतदारांचा प्रतिसाद त्यांना लाभला आहे. धुळे, नंदुरबार तसेच जळगाव या तीन जिल्ह्णांमध्ये संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी स्वत: प्रचाराची धुरा ताब्यात घेतली आहे. त्यामुळे डॉ. पाटील यांना विजयाची खात्री वाटू लागली आहे. डाव्या आघाडीचे कॉ. प्रकाश देसले यांनीही संपूर्ण मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला असून, डाव्या विचारसरणीचे पक्ष, संघटनांनी देसले यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे देसले समर्थकांनी त्यांच्या विजयाचा दावा करून चमत्कार घडण्याचे भाकीत केले आहे.
‘पदवीधर’चा प्रचार शिगेला
By admin | Published: January 29, 2017 12:46 AM