नाशिकरोड : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात १ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत पदवीधर मतदारांना आपल्या नावाची नोंदणी निवडणूक आयोगाच्या विहित नमुन्यातील अर्जाद्वारे करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी दुपारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डवले यांनी पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव नोंदणीसाठी १ नोव्हेंबर या अर्हता दिनांकाच्या पूर्वी किमान तीन वर्षे देशातील विद्यापीठाची पदवी किंवा त्यांच्याशी समतूल्य असलेली अर्हता धारकाकडे असणे आवश्यक असल्याचे सांगितले. या मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आवश्यक नमुना अर्ज १८ हा पाचही जिल्ह्यातील पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वरील कालावधीत उपलब्ध असणार आहे. तसेच सदरचा मतदार नोंदणी अर्ज विहित नमुन्यात टाईप करून भरला तरी स्वीकारला जाणार आहे. मात्र अर्जासोबत पदवी परीक्षेच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत व स्थानिक रहिवासी असल्याचा दाखला सादर करावा लागणार आहे.यापूर्वीच्या २०१० मधील मतदार यादीत नाव असलेल्या पदवीधर मतदारांनाही पुन्हा नव्याने मतदार नोंदणी अर्ज भरावा लागणार आहे. नव्याने भरावयाच्या मतदार नोंदणी अर्जात इपिक कार्ड नंबर, जन्मतारीख, नाते, फोटो, पदवी तपशील आदि बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. सध्या पदवीधर मतदारसंघासाठी एकूण दोन लाख ६२ हजार ३८७ इतके मतदार असून, ३५९ मतदान केंद्र आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमासाठी मतदान नोंदणी अधिकारी, सहायक मतदान नोंदणी अधिकारी यांच्यासह ९५ पदनिर्देशित अधिकारी महसूल विभागात कामकाज बघणार आहेत.यावेळी सामान्य प्रशासन उपायुक्त अनंद दहिफळे, माहिती उपसंचालक सतीश लळीत, तहसीलदार श्रीमती एस. डी. मोहिते, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, प्रभारी माहिती सहायक रवींद्र मोघे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पदवीधर मतदारांना नाव नोंदणीचे आवाहन
By admin | Published: September 30, 2015 12:16 AM