सिन्नर : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम स्थगित केला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण मान्यता देणे याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार दि. 27 ऑक्टोबर 2020 रोजी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे व अंतिम प्रभाग रचना दि. 2 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील 98 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना अंतिम होणार आहे. यावरून आगामी काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल पुन्हा वाजणार असल्याचे चित्र आहे.कोरोनामुळे राज्य निवडणूक आयोगाने 17 मार्चला ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश काढले होते.यामुळे तालुक्यातील 98 ग्रामपंचायतीच्यानिवडणुका थांबल्या होत्या. त्यानंतर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाचीनियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. आता राज्य शासनाने लॉकडाऊन नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. त्यानुसार सर्वसामान्य जीवन पूर्वपदावर येत आहे.त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर गेल्या.आता मात्र निवडणुकीची प्रक्रिया पूर्वतयारी प्रशासनाकडून सुरु होणार असल्याने गावपातळीवर निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीसाठीपुढचे वर्ष उजाडणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आणखी काहीमहिने वाट पहावी लागणार आहे.परिणामी ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. विशेष म्हणजेयावेळी निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगळी राहणार आहे.चौकट : सिन्नर तालुक्यातील 98 ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ आँगस्ट महिन्यात संपुष्टात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी विशेष ग्रामसभा घेऊन प्रभाग रचना व वार्ड निहाय आरक्षण काढण्यात आले आहे. त्यानतंर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हरकतीचीही सुनावणी झालेली आहे. त्यानतंर सदरचे प्रस्ताव मान्यतेसाठी मार्चमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली. त्यानंतर मार्चच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याने निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित केल्या होत्या.