नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीचे नामांकन आॅनलाइनच भरण्याचा अट्टाहास आयोगाने काहीसा बाजूला सारून ज्या ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेटची सुविधा नसेल तेथे उमेदवारांचे छापील अर्ज स्वीकारण्याची मुभा काही अटी शर्तींवर दिली असून, छापील अर्जातील माहिती संगणकात भरणे निवडणूक अधिकाऱ्यांना सक्तीचे केले आहे. येत्या २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात होऊन तीन दिवसांचा कालावधी लोटला असला तरी, आयोगाच्या वेबसाइटवरच उमेदवारांनी आॅनलाइन नामांकन दाखल करावे या आयोगाच्या सक्तीमुळे निवडणूक अधिकारी व उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्याने नामांकन कसे भरावे असा प्रश्न पडला, तर संग्राम व महा-ई-सेवा केंद्राचाही पत्ता नसल्याने निवडणूक प्रक्रियाच धोक्यात येते काय याबाबत साशंकता व्यक्त केली जात असल्याने त्याकडे जिल्हा प्रशासनाने आयोगाचे लक्ष वेधून मार्गदर्शन मागविले होते. नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी होणारी गर्दी व अखेरच्या क्षणाला नामांकन भरण्यासाठी पुढे आलेल्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारावा किंवा नाही याविषयीही संभ्रम होण्याची शक्यता आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यावर शनिवारी दुपारी राज्य आयोगाने या संदर्भातील काही बाबी स्पष्ट केल्या आहेत.
आॅनलाइन अर्जाची अट शिथील ग्रामपंचायत निवडणूक : मात्र संगणकीकरण सक्तीचे
By admin | Published: December 07, 2014 1:34 AM