जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील अनेक गावांमध्ये पराभूत उमेदवारांकडून काही सदस्यांना अपात्र करण्याचे डावपेच सुरू झाले आहेत. यातूनच दोनपेक्षा अधिक अपत्य, सरकारी जागेवरील अतिक्रमण, ग्रामपंचायतीच्या कराची थकबाकी, स्वच्छतागृह नसणे आदी कारणांचा शोध घेण्यात येत असून कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाल्याने नवनिर्वाचित सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान, तालुक्यातील सरपंच, उपसरपंचांची सोमवारी (दि. १५) निवड होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या रणनीतीमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.येवला तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. अनेक ठिकाणी सरपंच, उपसरपंच निवड होऊन गाव कारभाऱ्यांनी कारभार हाती घेतला आहे तर काही ठिकाणी निवड होणे बाकी आहे. अनेक गावात सरपंच व उपसरपंचपदासाठी रस्सीखेच बघायला मिळाली. अनेक ग्रामपंचायतीत चुरशीच्या लढती होऊन पॅनलला काठावर बहुमत मिळाले आहे तर काही ठिकाणी एक किंवा दोन सदस्य कमी निवडून आल्यामुळे सत्तेबाहेर राहण्याची वेळ प्रस्थापितांवर आली आहे. यातूनच विरोधी पॅनलच्या सदस्यांच्या फोडाफोडीमुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये बदल झाले तर काही गावात हे प्रयत्न सुरू होण्यापूर्वीच नूतन सदस्यांना अज्ञात ठिकाणी सहलीवर नेल्याने ग्रामपंचायत हातात राहिली.पण येवला तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण निश्चित झाले. त्यानंतर शुक्रवारी येवला तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली. यामुळे काही गावात सरपंच होण्यासाठी तर काही गावात उपसरपंचांसाठी जोरदार रस्सीखेच बघायला मिळाल्याने पॅनल प्रमुखांनी सावध पवित्रा घेतला आहे.या गावांमध्ये होणार सरपंचांची निवड...सोमवारी (दि. १५) अंगुलगाव, भुलेगाव, पारेगाव, नागडे, आडसुरेगाव, मातुलठाण ,बोकटे, कोळगाव, खामगाव, ममदापूर, खिर्डीसाठे, कुसमाडी, निमगाव मढ, गणेशपुर, पिंपळगाव जलाल, कोळम बुद्रुक ,धुळगाव, कानडी, सत्यगाव ,पिंपरी ,पाटोदा, पुरणगाव, पिंपळगाव लेप, सोमठाण देश, देवठाण ,विखरणी, सायगाव, खैरगव्हाण, भारम या ग्रामपंचायतीसाठी सभा होऊन सरपंच,उपसरपंच निवड होणार आहे.
निवडणूक प्रक्रियासरपंच उपसरपंच निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची वेळ सकाळी १० ते १२,सरपंच व उपसरपंच निवडीसाठी सभेची वेळ दुपारी २ वाजता, नामनिर्देशन पत्र छाननीची वेळ २ ते २:१५, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची वेळ २.१५ ते २.३०