नाशिक : थेट जनतेतून सरपंचपदासाठीच्या घेतलेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील सुमारे ९५ ग्रामपंचायतीत सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा भाजपाने केला आहे, तर ९१ जागांवर विजय मिळविल्याचा दावा राष्टÑवादीने केला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तरुणांच्या हाती सत्तेच्या चाव्या देत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का दिला आहे. गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असलेल्या मालेगाव तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना धोबीपछाड देत हिरे बंधूंनी सहा ठिकाणी भाजपाला यश मिळवून दिले आहे, तर केवळ तीन ठिकाणीच शिवसेनेला समाधान मानावे लागले आहे. चांदवड तालुक्यात ३० पैकी २० ठिकाणी महिला सरपंच निवडून आल्या आहेत. सिन्नर तालुक्यातील १२ पैकी आठ ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा दावा शिवसेनेतर्फे करण्यात आला असून, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीत ३२ वर्षांनंतर राष्टÑवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांनी ‘परिवर्तन’ घडवत शिवसेनेचे भास्करराव बनकर यांना पाय उतार केले आहे. सटाणा तालुक्यातील ४० पैकी ३२ ठिकाणी भाजपाने विजय संपादन केला आहे.मालेगावी फुलले कमळ; शिवसेनेला धोबीपछाडमालेगाव तालुक्यातील नऊ पैकी सहा ग्रामपंचायतींवर भाजपाने तर तीन ठिकाणी शिवसेनेला यश मिळाले आहे. तालुक्यातील सर्वात मोठ्या सौंदाणे आणि दाभाडी ग्रामपंचायत आपल्याकडे खेचण्यात भाजपा यशस्वी झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून तालुक्यातील ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व होते. भाजपाने सहा जागा मिळविल्याने आता शिवसेनेच्या गडाला एक प्रकारे सुरूंग लावल्यासारखेच झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपाठोपाठ हिरे बंधूंनी शिवसेनेला रोखण्यात यश मिळविले आहे. पाटणे, मोहपाडा, जाटपाडा येथे भाजपाची सत्ता आली तर टोकडे, रोझे आणि निंबायती येथे शिवसेनेला यश मिळाले.
जिल्ह्यात ग्रामपंचायतीत संमिश्र कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:13 AM