यापूर्वीही कोरोनामुक्त गावांमध्ये प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न निर्माण झाल्याने प्राथमिक शाळा ऑनलाइन व ऑफलाइन सुरू करण्यात आल्या आहेत. आता येत्या बुधवारपासून (दि. १५) इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. विशेषकरून शाळा सुरू करण्याबाबत अगोदर पालकांशी चर्चा करून ग्रामपंचायतीने तसे ठराव करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी गाव पातळीवर समिती स्थापन करून सरपंच, तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. ज्या गावात शाळा सुरू करण्यात येणार आहे त्या गावात किमान एक महिनाभर कोरोना रुग्ण आढळून आलेला नसावा, शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे, विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत गर्दी करण्यास मज्जाव करावा, विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे, विद्यार्थ्यांना टप्पाटप्प्याने शाळेत बोलविण्यात यावे, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर ठेवावे. संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था गावातच करण्यात यावी, असे नियम त्यासाठी लागू करण्यात आले आहेत.
-------------
शिक्षण विभागाकडून ग्रामपंचायतींना संपर्क
शासनाने ७ जुलै रोजी यासंदर्भातील आदेश काढला असून, कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतींनी तसेच पालकांनी निर्णय घ्यावयाचा आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांकरवी कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायतींना शासनाच्या या आदेशाची कल्पना दिली आहे.
* ग्रामपंचायतीला शाळा सुरू करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव करावा लागणार आहे.
* शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांचे संमती पत्र घेण्यात येणार आहे.
--------------
ग्रामपंचायतींना ग्रामसभेची प्रतीक्षा
ग्रामपंचायतींच्या ठरावाशिवाय शाळा सुरू करता येणार नसल्याने त्यासाठी ग्रामसभा बोलविण्याचा विचार ग्रामपंचायतींनी सुरू केला आहे. सध्या ग्रामीण भागातील ग्रामस्थ शेतकामात व्यस्त असल्याने ग्रामसभा घेण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी अगोदर पालकांशीही संपर्क साधला जात आहे.
-----------------
पालकांचीही हा..
गेल्या वर्षापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठी शाळा सुरू होणे गरजेचे असले तरी, कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे कोरोनाची काळजी घेत शाळा सुरू करण्याला काही हरकत नसावी.
- बाजीराव सोनवणे, पालक
--------------
कोरोनामुळे गेले संपूर्ण वर्ष विद्यार्थ्यांचे वाया गेले. अधूनमधून शाळांकडून पुढाकार घेत अभ्यास करवून घेण्यात आला; परंतु त्यातून विद्यार्थी किती शिकले हे समजू शकले नाही. साऱ्यांनाच वरच्या वर्गात पाठविण्यात आल्यामुळे आता शाळा सुरू व्हाव्यात.
- देवीदास शिंदे, पालक
---------------
शिक्षणाधिकारी म्हणतात..
शासनाने ७ जुलैच्या निर्णयानुसार इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुक्त गावांमध्येच या शाळा सुरू होतील. संबंधित गावात एक महिन्यापूर्वीपासून कोरोनाचा एकही रुग्ण असता कामा नये अशी मुख्य अट घालण्यात आली आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर ग्रामपंचायतींना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मोठी जबाबदारी उचलावी लागणार आहे.
- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी
----------
तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे
नाशिक- ४६
बागलाण- १४३
चांदवड- ५६
देवळा- ३७
दिंडोरी- १३१
इगतपुरी- ११२
कळवण- १३२
मालेगाव- ९९
नांदगाव- ७९
निफाड- ९८
पेठ- १४२
सिन्नर- २८
सुरगाणा- २८
त्र्यंबक- ३०
येवला- ८५
---------------
जिल्ह्यातील एकूण गावे
१९२७
------
सध्या कोरोनामुक्त असलेली गावे
१२४६
-------------
विनाअनुदानित-२१७
अनुदानित- ६२४
शासकीय- ७६७
-------
जिल्ह्यातील एकूण शाळा
१६०८