नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज सादर केलेल्या लाभार्थींना जागा मंजुरीसाठी शुक्रवारी नाशिक तालुक्यातील गावांमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समितीने केले आहे. २०१६-१७ या वर्षासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नाशिक तालुक्यासाठी ५४० इतके उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यातील ५४० लाभार्थींना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात अनुसूचित जातीचे २६, अनुसूचित जमातीचे ४०२ व इतर १११ लाभार्थींचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत पात्र लाभार्थींची नोंदणी करण्यासाठी लाभार्थींकडून कागदपत्रे घेण्यासाठी तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसाहाय्य योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थीकडे घरकूल बांधण्यासाठी स्वत:ची जागा उपलब्ध नाही अशा गरजू लाभार्थींना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. आवास मंजूर करण्यात आलेल्या ५४० पैकी ५२७ लाभार्थींना घरकूल बांधण्यासाठी प्रथम हप्ता वितरित करण्यात आला असून, कामासही सुरुवात झाली आहे. शुक्रवारी होणाऱ्या ग्रामसभेत राज्य पुरस्कृत योजनांची सन २०१५-१६ या पूर्वीची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी वर्षनिहाय व कामाच्या टप्प्यानिहाय लाभार्थींच्या याद्या बनविण्यात येणार असून, लाभार्थींनी आपले घरकूल अद्याप पूर्ण नसल्यास यादीत नावे समाविष्ट आहेत किंवा नाही याची खात्री करता येणार आहे. (प्रतिनिधी)
‘आवास’साठी ग्रामसभा
By admin | Published: April 20, 2017 12:32 AM