लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे : नाशिक तालुक्यातील माडसांगवी गावात दारूबंदीसाठी दोन दिवसांपूर्वी महिलांनी काढलेल्या मोर्चाची दखल घेत ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून गाव व परिसरात यापुढे थेंबभरदेखील दारू विकली जाणार नाही, असा दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे.
शुक्रवारी झालेल्या या सभेसाठी गावातील शेकडोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी गावात व्यसनाधीनता वाढू दिली जाणार नसल्याचा संकल्प करण्यात आला. तसेच आषाढी वारीसाठी जाणाºया वारकऱ्यांनीही ग्रामसभेत सहभाग घेऊन दारूबंदी ठरावाला पूर्ण पाठिंबा दिला. माडसांगवी गाव व परिसरात अवैध दारूधंदे बेसुमार वाढल्याने गावातील अल्पवयीन मुले, युवक व नागरिक मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेले आहेत, परिणामी गावात वेळोवळी अशांतता निर्माण होत असून, महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक वाद, हाणामाºयाच्या घटना वाढल्याने गावातील माळवाडी भागातील महिलांनी एकत्र येऊन दारूधंद्यावर दांडके मोर्चा नेला होता. गावात दारूबंदी जाहीर करावी यासाठी सरपंच तसेच आडगाव पोलिसांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत ग्रामपंचायतीने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. यावेळी महिला वर्गाने दारूबंदीचा ठराव मांडला. या ठरावावर ग्रामसभेत सविस्तर चर्चा होऊन, सर्वानुमते माडसांगवी ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी या ठरावाला पूर्ण पाठिंबा देऊन एकमुखाने गावात संपूर्ण दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव राज्य शासनाला पाठवला जाणार असून, त्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे यावेळी सरपंच रेखा घंगाळे यांनी जाहीर केले. यावेळी उपसरपंच मीराताई पेखळे, ग्रामसेवक भामरे, दारूबंदी समिती प्रमुख हिरामण पेखळे, ग्रामपंचायत सदस्य सुनंदा पेखळे, रंगनाथ जाधव, सुनील बर्वे, पंडित पेखळे, सुमनबाई अश्वरे, भोईर, बिडवे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, महिला, युवक, वारकरी उपस्थित होते.