नाशिक : नववर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील ४० पोलीस ठाणे हद्दीत ठाणेनिहाय चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़ सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील महामार्ग, वर्दळीचे ठिकाणे, चेक पोस्टवर बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली आहे़
मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई केली जाणार असून यासाठी ब्रेथ अॅनालायझर मशीन सज्ज ठेवण्यात आले आहेत़ जिल्ह्यातील हॉटेल्स, ढाबे, रिसॉर्ट या ठिकाणांवर फिक्स पॉइंट लावून वाहतूक कोंडी आणि सुरक्षात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे़ याबरोबरच महामार्ग, रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने पेट्रोलिंग सुरू असणार आहे़ महिला व मुलींची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस व दामिनी पथक तैनात करण्यात येणार आहे़
जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे, रिसॉर्ट, हॉटेल्स, ढाबे, मॉल्स या परिसरात पोलिसांनी करडी नजर असून, नाकाबंदीत प्रत्येक वाहनचालकाची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करून ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई केली जाणार आहे़ राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गावर परराज्यातून होणारी अवैधरीत्या मद्याची विक्री व वाहतुकीस प्रतिबंध होण्यासाठी चेकपोस्टवर नाकाबंदी करून कारवाई करण्यात येणार आहे़
पोलीस ठाणेनिहाय मॉकड्रीलकायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस ठाणेनिहाय मॉकड्रील सुरू करण्यात आले आहे़ याबरोबरच दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची प्रात्यक्षिके सुरू आहेत़
पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनातअपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह जिल्ह्यातील आठ उपविभागनिहाय उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक शाखा, पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.- संजय दराडे, अधीक्षक, नाशिक ग्रामीण