पेठ - आगाराची दाभाडी-घुबड साका ही मुक्कामाला जाणारी बस ऊशीरा सुटत असल्याने अनेक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावर उतरून रात्रीच्या अंधारात जंगलातून मार्ग काढत घर गाठावे लागत असल्याने अनेक वेळा जंगली श्वापदांचा सामना करण्याची वेळ येते. घुबडसाका, दाभाडी, उंबरपाडा, कापूर्णे, काळूणे, या भागातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी पेठला येतात. सायंकाळी पेठ-घुबडसाका ही एकमेव बस असल्याने सर्व विद्यार्थी थांबून राहतात. मात्र ही बस पाच वाजता सुटते. मजल दरमजल करत या बसला पोहचायला अंधार पडतो. बर्याच मुलांना मुख्य रस्त्यावर उतरून दोन- तीन किलोमीटर पायवाटेने जावे लागते. त्यामूळे अंधारातून मार्गक्र मण करतांना जंगली श्वापदांचाही सामना करावा लागत असल्याने जीवघेणी कसरत करावी लागते.पेठ -दाभाडी-घुबडसाका ही बस पाच ऐवजी लवकर सोडण्यात यावी अशी मागणी पेठ तालुका युवक कॉग्रेसच्या वतीने आगार व्यवस्थापक स्वप्नील आहिरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी युवक कॉग्रेस तालुकाध्यक्ष विशाल जाधव, संदिप भोये, विष्णू सातपुते, मनोहर गावीत यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामीण विद्यार्थ्यांना करावा लागतो जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 2:33 PM